कोल्हापूर : जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची मंगळवारी सकाळी सदिच्छा भेट घेतली. शहर, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक यंत्रणेतील सुसूत्रता, महिला सुरक्षिततेसह विविध प्रश्नांवर गुप्ता यांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
‘पुढारी’ परिवाराच्या वतीने समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन, सीमा लढा आदी विविध आंदोलने, चळवळी, सामाजिक प्रश्न, महिला सुरक्षितता, कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली.
करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो भाविक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात करवीरनगरीत दाखल होत असतात. त्यामुळे शहर, जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणून शिस्त लावण्याबाबत ठोस उपाययोजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी दिली. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी, कोल्हापूर खंडपीठासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही डॉ. जाधव आणि गुप्ता यांच्यात तासभर चर्चा झाली.
सामाजिक प्रश्नांबाबत दैनिक ‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांनी घेतलेल्या लोकहिताच्या भूमिकेबद्दल पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे कौतुक केले. जगातील सर्वोच्च रणभूमीवर उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलसह ‘पुढारी’च्या सामाजिक योगदानाबद्दल गुप्ता यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक गुप्ता यांचा शाल, श्रीफळ व करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी अभिवादन केले.