कोल्हापूर : जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सोमवारी सायंकाळी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

kolhapur | पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कायदा-सुव्यवस्था, शहर वाहतूक नियंत्रण, महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. शहर, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेतील सुसूत्रता, महिला सुरक्षिततेसह विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर नीलोत्पल यांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली.

जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन, सीमालढा आदी विविध आंदोलने, चळवळी, सामाजिक प्रश्न, महिला सुरक्षितता, कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा दर्शनासाठी देश- विदेशातील लाखो भाविक, पर्यटक करवीरनगरीत दाखल होत असतात. त्यामुळे शहर, जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणून शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

सध्याच्या राजकीय, सामाजिक घडामोडी, कोल्हापूर येथील सर्किट बेंच, कोल्हापूर खंडपीठासह विविध प्रश्नांवरही डॉ. जाधव आणि नीलोत्पल यांच्यात तासभर चर्चा झाली. सामाजिक प्रश्नांबाबत दैनिक ‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांनी घेतलेल्या लोकहिताच्या भूमिकेबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. जाधव यांचे कौतुक केले. जगातील सर्वोच्च रणभूमीवर उभारलेल्या सियाचिन हॉस्पिटलसह ‘पुढारी’च्या सामाजिक योगदानाबद्दलही नीलोत्पल यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT