कोल्हापूर : साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनच्या बैठकीत बोलताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल. शेजारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक किरण लोंढे, विकास जाधव, श्रीराम कन्हेरकर, संतोष डोके.   (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | इतर दिवशी मिरवणुकीत साऊंड सिस्टीम लावल्यास जाग्यावर जप्त

पोलिस अधीक्षक नीलोत्पल; लाईट, साऊंड मालक पोलिस प्रशासनाची बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच कोल्हापुरातील मंडळांना नियमावली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुकीचे दिवस प्रशासनाने निश्चित केले आहेत. यावेळी आवाज मर्यादेचे पालन करून साऊंड लावण्यास परवानगी दिली असून, यास मंडळांनीही सहमती दिली आहे. इतर दिवशी साऊंड सिस्टीमसह मिरवणुकीस बंदी असून, साऊंड व लाईट मालकांनी मंडळांनी परवानगी घेतली आहे का, याची खात्री करूनच साऊंड सिस्टीम, लाईट लावावी; अन्यथा सर्व साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.

गुरुवारी (दि. २७) सायंकाळी जिल्ह्यातील साऊंड सिस्टीम, लाईट, जनरेटर मालकांची बैठक अलंकार हॉलमध्ये पार पडली. प्रास्ताविकेमध्ये शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी साऊंड सिस्टीम चालक आणि मालकांनीही आवाज मर्यादेचे भान राखावे. मर्यादेचे पालन करूनच साऊंडला परवानगी दिल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक किरण लोंढे, विकास जाधव, श्रीराम कन्हेरकर, संतोष डोके उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, एकाच जागेवर मिरवणूक रेंगाळण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते डिझेल संपणे, किल्ली हरवली, चाकातील हवा गेली असे बहाणे करताना दिसतात. असा कोणताही बहाणा यंदा खपवून घेतला जाणार नसून, वाहनांचे फिटनेस तपासण्यासाठी थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाच सहभागी करून घेण्यात येणार आहे. मिरवणूक रेंगाळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करून मिरवणुकीतून त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लेझर, प्रेशर मिड, सीओटूला बंदीच

मिरवणुकीत लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात. अशावेळी कर्णकर्कश आवाज, स्मोकरमधून येणारा कार्बन डायऑक्साईड, डोळ्यांना इजा पोहोचविणारे लेसर याचा त्यांना धोका उद्‌भवतो. यामुळे लेझर, प्रेशर मिड, सीओटूला यंदाही बंदी घातली आहे. असे मटेरिअल व्यावसायिकांनी मंडळांना पुरवू नये, अन्यथा ते जप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात इतर दिवशी परवानगी द्या

ग्रामीण भागात पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन होते. हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. यामुळे पूर्वपरवानगी तपासून ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुकीत साऊंडला परवानगी द्यावी, अशी मागणीही साऊंड सिस्टीम, लाईट व जनरेटर असोसिएशनने केली. या मागण्यांचे निवेदनही प्रशासनास दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT