कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिर आणि खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान कोपेश्वराचे दर्शन घेतले व विशेष महापूजेत सहभाग घेतला. त्यांचा हा दौरा पूर्णतः खासगी व कौटुंबिक स्वरूपाचा होता. (Sonal Shah visit Narasoba Wadi)
सोनल शहा यांचे खिद्रापूरमध्ये आगमन झाल्यावर मंदिर प्रशासनातर्फे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंदिराचे पुजारी रमेश जोशी यांच्या उपस्थितीत विधीवत महापूजा पार पडली. इतिहास अभ्यासक शशांक चोथे यांनी मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि कोपेश्वर मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. मंदिराची प्राचीन स्थापत्यकला, गाभाऱ्याची रचना, तोरण, स्तंभ व परिसरातील विविध मूर्ती पाहताना शहा यांनी विशेष रस दाखवला.
मंदिराच्या शांत, कलात्मक वातावरणाने त्या विशेष प्रभावित झाल्या. या दौऱ्यात सोनल शहा यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनही घेतले. दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव विजय काळू, पुजारी, सरपंच चित्रा सुतार व माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले.
या दौऱ्यावेळी शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सरपंच सारिका कदम, तंटामुक्त अध्यक्ष आण्णासाहेब कुरुंदवाडे, ग्रा.प सदस्य अमित कदम, सईदा शिरगगुप्पे, पंचाक्षरी कोष्टी, राजेंद्र सुंके, रोहिणी कांबळे, जयश्री लडगे, रामगोंड पाटील, दयानंद माने, गणेश पाखरे, जहांगीर सनदी आदी उपस्थित होते.