आजरा : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील तरुणाने कामधंदा करत नाहीस. बसून खातोस, असे म्हटल्याच्या रागातून वडील आणि आईचा खून केला होता. याप्रकरणी मुलगा सचिन ऊर्फ पप्पू कृष्णा गोरूले (वय 32) याला गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी जन्मठेप, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुनील तेली यांनी काम पाहिले. याप्रकरणी एकूण 19 साक्षीदार तपासण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, सचिन हा सुरुवातीला कागल औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत होता. त्याचे लग्न झाले होते. मात्र, वादामुळे त्याचा घटस्फोट झाला होता. यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. अशातच आई-वडिलांशीही त्याचा वाद होत होता. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सचिनला आई-वडिलांनी तू काही कामधंदा करत नाहीस, खावून पिऊन झोपतोस, असे म्हटल्यामुळे त्याला प्रचंड राग आला. या रागातच त्याने आई पारुबाई यांच्या चेहर्यावर, कपाळावर, मानेवर, खुरप्याने वार करून गंभीर जखमी केले होते. अशा अवस्थेत पारुबाई यांनी घराबाहेर पळ काढला.
सचिन याने त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून वडिलांच्या गळ्यावर, डोळ्याच्या बाजूस खुरप्याने वार करून त्यांना जागीच ठार मारले होते. दरम्यान, बहिरेवाडी गावची लक्ष्मी यात्रा असल्याने लोकांना खुनाची माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने जमा झाले. सचिन पळून जाऊ नये म्हण्ाून त्याला घरात कोंडले व पारुबाई यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, बारा दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी गडहिंग्लज न्यायालयात दोन वर्षे सुनावणी सुरू होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तपास पूर्ण केला होता.