कोल्हापूर

कोल्हापूर : सुळकुड योजनेबाबत नेतेमंडळींचा आता कस लागणार

backup backup

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीसाठी सुळकुड येथून दूधगंगेतून पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेला दूधगंगा नदी काठावरून तीव्र विरोध होत आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका दूधगंगा नदी काठाने घेतली आहे. तर या विरोधाला न जुमानता दूधगंगेतूनच पाणी घेणार अशी भूमिका इचलकरंजी करांनी घेतली आहे. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आता तर या लढ्यात राजकीय नेते मंडळीचा सहभाग झाल्याने ही योजना विरोधक व समर्थक या दोन्हीकडील नेतेमंडळीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ही योजना रद्द करण्यासाठी व पूर्णत्वासाठी दोन्हीकडे नेतेमंडळीचा कस लागणार आहे. याबाबत दोन्ही कडील नेतेमंडळी व कृती समितीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपापल्या परीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हाधिकारी यांनीही याबाबतचा अहवाल प्रशासनाला कळवून शासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. यानंतर दोन्हीकडील नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदर योजनेबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे सुळकुड योजनेचा हा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेला असून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच वेळ देऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

वास्तविक सुळकुड योजना मंजूर झाल्यानंतर लगेचच दूधगंगा नदी काठावरून याला हळूहळू विरोधाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला या विरोधात येथील नेतेमंडळींनी फारसा रस घेतला नव्हता. मात्र बघता बघता दूधगंगा नदी काठ एकवटू लागला व याची व्याप्ती वाढत गेली. तसेच चालू वर्षी पाऊस लांबल्याने दूधगंगा नदी पात्र तब्बल ९ वेळा कोरडे पडले तसेच पाण्याअभावी दूधगंगा नदी काठावरील नागरिकांना वनवन भटकावे लागले. तर पाण्याविना दूधगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली शेकडो एकर शेती वाळली. त्यामुळे इचलकरंजीसाठी मंजूर झालेली ही योजना पूर्णत्वास गेली तर दूधगंगा नदी काठाला किती फटका बसेल याचे गांभर्य ओळखून कागल, शिरोळ, राधानगरी, भुदरगड या तालुक्यातील नेते राज्यमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के पी पाटील, समरजीतसिंह घाटगे यासह इतर नेतेमंडळी ही योजना रद्द करण्यासाठी दूधगंगा नदी काठाबरोबर आंदोलनात उतरले आहेत. तर इचलकरंजीला पाणी दूधगंगेतूनच मिळावे यासाठी व इचलकरंजी हे राजकीय भवितव्य ठरवणारे मतदारसंघ असल्याने या योजनेच्या समर्थनात या भागातील खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर व इतर नेतेमंडळी इचलकरंजीतील कृती समिती बरोबर यात उतरले त्यामुळे आता ही योजना रद्द होणार की पूर्ण याबाबत नेतेमंडळींचा कस लागणार आहे.

सुळकुड योजना रद्द व्हावी व ही योजना पूर्ण व्हावी यासाठी योजनेचे विरोधक व समर्थक असे दोन्हीकडील अधिकांश नेतेमंडळी सत्ताधारी गटातीलच असल्याने मुख्यमंत्र्यांसमोर चक्रव्यू असणार आहे व तो भेदण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदर योजनेबाबत पूर्णपणे सखोल अभ्यास करून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे.

सुळकूड योजनेच्या विरोधातील गावे

सुळकुड योजनेला दूधगंगा नदी काठावरील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, हेरवाड या गावातून तसेच कागल तालुक्यातील कागल, वंदूर, सुळकुड, कसबा सांगाव, रणदेववाडी यासह राधानगरी व भुदरगड तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. याचबरोबर कर्नाटकातील बोरगाव, सदलगा, एकसंबा, मलिकवाड आधी गावातूनही ती तीव्र विरोध होत आहे.

आतापर्यंत सुळकुड योजना रद्द व्हावी यासाठी मोर्चे काढून तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. तसेच मंजुरी आदेशाची ठीक ठिकाणी होळी करण्यात आली आहे. याचबरोबर गाव बंद ठेवण्यात आले आहेत व लाक्षणिक उपोषण ही करण्यात आली आहेत. इचलकरंजीच्या समर्थनात उतरलेल्या राजकीय नेत्यांचा या गावात निषेधही व्यक्त करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT