कोल्हापूर ःविधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंड केलेल्या काँग्रेसच्या डझनभर माजी नगरसेवकांचा एक गट पक्षाला रामराम ठोकून शिंदे गट, भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या जवळील एका माजी पदाधिकार्याचा त्यामध्ये पुढाकार आहे. त्यामुळे तो काँग्रेस आणि त्यांचे नेते सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विधानसभेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये नेत्यांच्याविरोधात हा संघर्ष उफाळून आला. कार्यकर्ता पॅटर्न राबवत सतेज पाटील यांनी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षात खदखद होती. गटनेते शारंगधर देशमुख, शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षांत जाण्याचा विचार डझनभर माजी नगरसेवकांनी केला आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेऊन इतर पक्षांत प्रवेश केला जाणार असल्याचे समजते.