कोल्हापूर : महाराष्ट्रात तयार होणाऱ्या सौर ऊर्जेचे प्रमाण वेगाने वाढत असून दुपारच्या वेळेत अतिरिक्त वीज निर्माण होत आहे. वीज साठवणूक क्षमता नसल्याने रात्रीच्या वेळी औष्णिक वीज खरेदी करून गरज भागवावी लागते. सध्या हा विचित्र पेच ऊर्जा विभागासमोर उभा आहे. दिवाळीच्या दोन दिवसांत वीज वापर कमी झाल्याने दुपारच्या वेळात ग्रीडमध्ये वीज स्वीकारणेच थांबवण्यात आले होते. त्यामुळे ती वाया गेली. पुढील काळात सौर ऊर्जा आणखी तयार होणार असून, असे प्रकार वाढणार आहेत.
राज्य भार प्रेषण केंद्राच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याची एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमता ५०,३३१ मेगावॅटवर पोहोचली असून, त्यात अक्षय ऊर्जेचा वाटा २०,२५१ मेगावॅट (सुमारे ४० टक्के) आहे. ‘महाऊर्जा’च्या नोंदीनुसार, राज्याची सौरऊर्जा क्षमता १३,६९० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत प्रकल्पांमधून ५,००० ते ७,००० मेगावॅट वीज एकाच वेळी ग्रीडवर येते. मात्र, दिवाळीसारख्या सुट्ट्यांच्या काळात कारखाने बंद असल्याने राज्याची वीज मागणी २४,००० मेगावॅटवरून थेट १५,५०० मेगावॅटपर्यंत खाली आली. सूर्यप्रकाश असेपर्यंत सौर प्रकल्पांची वीजनिर्मिती थांबवता येत नाही. त्यामुळे ग्रीडची वारंवारता५०.०५ हर्ट्झच्या मर्यादेबाहेर जाऊन ‘ब्लॅकआऊट’ होऊ नये, यासाठी वीजपुरवठा ग्रीडपासून तोडून वीज नाकारण्यात आली.
नवीन नियमानुसार १०० किलोवॅटपुढील प्रकल्पांना ‘बॅटरी स्टोरेज’ बंधनकारक केले असले, तरी वाढता भांडवली खर्च आणि तांत्रिक उभारणीमुळे या यंत्रणा कार्यान्वित होण्यास २०२७-२८ उजाडणार आहे. मात्र, आधीच मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना ही अट लागू नसल्याने ‘स्टोरेज तयार होण्यापूर्वीच सौरऊर्जेचा महापूर’ अशी स्थिती निर्माण होईल.
आगामी काळातील संकट
सध्याच्या क्षमतेतच ग्रीडचा तोल सांभाळताना यंत्रणेची दमछाक होत असताना, आगामी काळात राज्यात नवीन सौर प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ अंतर्गत तब्बल १६,००० मेगावॅटचे प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील ओपन ॲक्सेसचे हजारो मेगावॅटचे मेगा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. राज्याची कमाल मागणी ३३,०५१ मेगावॅटच्या घरात असताना, पुढील वर्षभरात अतिरिक्त १५,००० मेगावॅट सौरऊर्जा ग्रीडमध्ये दाखल होणार आहे.Solar Energy