सरवडे: सोळांकूर( ता.राधानगरी) येथील सानिका गणेश पोतदार (वय.२२) या विवाहितेचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला सदरची विवाहिता ही तिसऱ्या वेळेला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे दाखल झाली होती. प्रसुती सिझेरीनद्वारे करुन तिने स्त्री अभ्रकाला जन्म दिला.
यानंतर काही वेळात तिची प्रकृती खालावली दरम्यान तिला व्हेंटिलेटरवर ठेवून रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालय कोल्हापूर याठिकाणी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु नातेवाईक व ग्रामस्थांनी सोळांकूर येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सानिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांच्यावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सोळांकूरात वातावरण गंभीर बनले होते.
विवाहितेचा मृत्यू झालेची बातमी समजताच रात्री सोळांकूर ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी डॉक्टरांना घेराव घालून विवाहितेचा मृत्यू हा येथेच उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे झालेचा आरोप करत दोषींवर कारवाई झालेखेरीज मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा घेतला. शिवानंद महाजन, विकास पाटील, अरविंद निचीते, रावसाहेब पानारी, संजय कांबळे, रणजित मुधोळकर, संजय परीट, दिनेश पाटील,मिथुन पानारी, संकेत कदम, अनिल पानारी, मिलिंद कुंभार आदिंसह ग्रामस्थांनी ही मागणी लावून धरली.
सानिकाचा चार वर्षांपूर्वी विवाह गणेश पोतदार या युवकांशी झाला होता. तिचे पहिले बाळ पोटातच सात महिन्याचे असताना दगावले होते दुसरा मुलगा अडीच वर्षांचा आहे आज जन्मलेली नवजात मुलगी केवळ एक दिवसाची असून ती जन्मताच मातृत्वाला मुकली आहे. याबद्दल नातेवाईक व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सानिका पोतदार ही विवाहिता रुग्णालयात बुधवारी (दि.४) प्रसुतीसाठी दाखल झाली होती. तिची दुसरी प्रसूती सर्वसाधारण झालेमुळे सदरची प्रसुतीसाठी सर्वसाधारण होण्यासाठी आमच्या टीमने प्रयत्न केलेत पण ती न झालेमुळे सिझेरीन शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला व प्रसूती व्यवस्थित होऊन बाळ सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान गर्भाशयात साठलेले पाणी रक्तवाहिनीतून ह्रदय व फुफ्फुसामध्ये गुठळ्या गेल्या व श्वासोच्छ्वास गुदमरून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.डॉ ज्योती कोल्हे , वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळांकूर
दोन चिमुकली पोरकी व ग्रामस्थांचा घेराव
विवाहितेचा मृत्यू झालेमुळे तिची अडीच वर्षे व एक दिवसाची ही दोन मुले मातृत्वाचा पोरकी झाली असून याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रुग्णालयातील भोंगळ व निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढत रुग्णालयावर मोर्चा काढून रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रस्तुतीसाठी आलेल्या सानिका पोतदार या महिलेचा अपघाती मृत्यू नसून रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. असा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर रुग्णाचा मृत्यू झाल्यावर तिला कोल्हापूरला पाठवण्यात आल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य सेवेत आवश्यक साधने आणि व्यवस्था असताना उपचारांमध्ये घाई का करण्यात आली? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला.
गरीब कुटुंबातील या मुलीला न्याय मिळणार का?
ग्रामीण रुग्णालयातील या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात केल्यावरच मृतदेह ताब्यात घेतला जाईल असा इशारा अशी नातेवाईक व ग्रामस्थांनी दिला आहे.