आशिष शिंदे
कोल्हापूर : जिल्ह्यात श्वसनाचे आजार गंभीर बनत आहेत. यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढला आहे. बॅक्टेरियल न्यूमोनिया झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर 36 टक्के इतका वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशा रुग्णांवर उपचार करताना निकामी अवयव मूल्यांकन (सिक्वेश्नल ऑर्गन फेल्युअर अॅसेसमेंट) ही अत्याधुनिक निदान पद्धत प्रभावी ठरत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये करण्यात आलेल्या संशोधातून हे सिद्ध झाले आहे. या हायटेक व प्रभावी निदान पद्धतीद्वारे सीपीआर रुग्णालयात उपचार केले जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसातील संसर्ग. यामध्ये फुफ्फुसांतील वातपिंडांमध्ये पस किंवा द्रव जमा होतो. परिणामी, श्वास घेण्यास त्रास होतो. न्यूमोनियामुळे होणार्या अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच श्वसनाचा गंभीर आजार होतो. अशा रुग्णांमध्ये सोफा स्कोअर (सिक्वेश्नल ऑर्गन फेल्युअर अॅसेसमेंट) एक प्रभावी निदान पद्धत ठरत आहे. सहा महिने रुग्णांवर संशोधन केल्यानंतर या अभ्यासात बॅक्टेरियल न्यूमोनिया हा अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमसाठी (एआरडीएस) कारणीभूत ठरला असून, अशा रुग्णांमध्ये मृत्यू दर 36 टक्के इतका वाढला आहे. हा निरीक्षणाधारित अभ्यास सहा महिन्यांच्या कालावधीत 41 रुग्णांवर करण्यात आला. यामध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा मृत्यू दर 37 टक्के, परॅसिटिक न्यूमोनियाचा मृत्यू दर 33.33 टक्के इतका वाढल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात बॅक्टेरियल न्युमोनियाच्या रुग्णांचा सरासरी मुक्काम 13 दिवस, व्हायरल न्यूमोनियासाठी 11 दिवस आणि परॅसिटिकसाठी 10 दिवस नोंदवला गेला.
सोफा स्कोअर म्हणजे सिक्वेश्नल ऑर्गन फेल्युअर अॅसेसमेंट. हा अतिदक्षता विभागात वापरण्यात येणारा एक मानक निकष आहे. जो रुग्णांच्या महत्त्वाच्या सहा अवयव प्रणालींच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करतो. यामध्ये श्वसन प्रणाली, मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड, रक्तमधील प्लेटलेट्सवरुन एक रेशो ठरवलिला जातो. प्रत्येक प्रणालीला 0 ते 4 स्कोअर देण्यात येतो. एकूण स्कोअर 0 ते 24 पर्यंत असतो. स्कोअर जास्त असला, तर रुग्णाची स्थिती गंभीर असते आणि मृत्यूचा धोका अधिक असतो. त्यावरुन उपचार पद्धत ठरविण्यास मदत होते.