कोल्हापूर

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन : पर्यावरण जतनासाठी कृतिशील उपक्रमांचा निर्धार;

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  प्रत्येक सजीव घटकाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाशिवाय पर्याय नाही. पर्यावरण जतन-संवर्धन-संरक्षणासाठी कृतिशील उपक्रम राबवण्याचा निर्धार कोल्हापुरातील सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरणप्रेमींनी बुधवारी केला. दैनिक 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन आयोजित 'पक्षी वाचवा' अभियानात पर्यावरणप्रेमींनी ही एकजूट दाखविली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी कॉलेज) येथे हा उपक्रम झाला.

अभियानाचा प्रारंभ वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ— राखीव क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत, कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, दैनिक 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ सुहास वायंगणकर, निसर्ग मित्र परिवाराचे कार्यवाह अनिल चौगुले, कन्झर्व्हेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे आशिष घेवडे, प्राचार्य डॉ. ए. व्ही. पौडमल, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जूबेन कटारिया, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे विजयकुमार यवलुजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमासाठी जैन सोशल ग्रुपतर्फे पक्ष्यांसाठीची घरटी, पाणीपात्रे, धान्य, रोपे तर रोटरी क्लबने वृक्षारोपणासाठीची सामग्री अशी वस्तू स्वरूपातील मदत केएमसी कॉलेजकडे सुपूर्द करण्यात आली. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रयोग सोशल फाऊंडेशनचे समन्वयक विक्रम रेपे यांनी केले.

अभियानात उपक्रमामागील 'पुढारी'ची भूमिका मांडताना विजय जाधव म्हणाले, कोल्हापूरला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासूनचा पर्यावरणप्रेमाचा वारसा लाभला आहे. हा वारसा अबाधित राखण्यासाठी पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत प्रत्येक घटकाने कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे. युवकांच्या प्रचंड ऊर्जेचा यासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयात ही पर्यावरणाची चळवळ राबवावी यासाठी दै. 'पुढारी'चे सदैव पाठबळ राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नानासाहेब लडकत म्हणाले, सह्याद्री व्याघ— प्रकल्पाप्रमाणेच इतर वन्यजीव आणि पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असणार्‍या वृक्षवल्लीच्या संरक्षणासाठीही तितकेच प्रयत्न गरजेचे आहेत. पूर्वजांचा हा ठेवा भावी पिढीसाठी जपणे व विकसित करणे काळाची गरज आहे.

जी. गुरुप्रसाद म्हणाले, निसर्गात निर्माण होणार्‍या समस्या स्वत: निसर्गच सोडवतो. त्याच पद्धतीने माणसाने निर्माण केलेल्या समस्या माणसांनीच सोडविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करणे काळाची गरज आहे. यापुढे जल, जंगल व जमीन रक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.

सुहास वायंगणकर म्हणाले, शाळा-महाविद्यालयांत ग्रीन कॅम्पस आणि स्थानिक वृक्षारोपणासह छोट्या पर्यावरणपूरक कृती गरजेच्या आहेत. पक्ष्यांसाठी 81 प्रकारच्या वृक्षांची गरज आहे. निसर्ग मित्र अनिल चौगुले म्हणाले, पर्यावरणाबरोबरच अन्न सुरक्षा काळाची गरज आहे. उद्यान आणि वृक्षारोपण आराखडा लोक सहभागातून व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पर्यावरणपूरक प्रत्येक उपक्रमात महापालिकेच्या माध्यमातून सवर्र्तोपरी सहकार्याची ग्वाही दिली. उपक्रमात जैन सोशलचे वनेचंद कटारिया, अजित गुंदेशा, आशिष गांधी, महेश ओसवाल, सुनित पारीख, रोहित पारिख, रोटरीचे सचिव डॉ. भूषण शेंडगे, अभिजित माने, रवी मायदेव, विनोद कांबोज, केएमसीचे प्रा. डॉ. प्रशांत नागावकर, प्रा. विठ्ठल नाईक, प्रा. डॉ. एस. पी. कांबळे, प्रा. युवराज मोटे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT