कोल्हापूर

वीज खंडिताला वैतागून नागरिकांनी महावितरण कार्यालयात सोडला साप

...महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : वीज खंडितीच्या त्रासाने हैराण झालेल्या पाणदारे मळी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरशः थरारक मार्ग निवडला. मध्यरात्री लाईट गुल झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घरात शिरलेला साप पकडून थेट महावितरण कार्यालयात नेला आणि टेबलावर ठेवत निषेध नोंदवला.

नदीकाठी वसलेल्या या भागात सुमारे ४० घरे आणि १५० नागरिक वास्तव्यास आहेत. अंधारामुळे विषारी सापांचा धोका अधिक वाढतो. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे. अनेकदा संपर्क साधूनही नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर झाला.

घटनेच्या रात्री अंधारात घरात घुसलेल्या सापाला पकडून नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठले. टेबलावर साप ठेवत त्यांनी प्रशासनाला जणू ‘जागे व्हा’ असा इशारा दिला. या धक्कादायक प्रकारानंतर तत्काळ वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अखंडित वीजपुरवठा आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी शशिकांत चौधरी, भाऊसो चौधरी, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT