कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसच्या एका डब्याखालील ब्रेकमधून धूर आला. मोठ्या प्रमाणात धूर आल्याने स्थानकावर दाखल होताच गाडीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यावेळी पळापळही झाली. कर्जत स्थानकावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
खंडाळा घाट उतरून कोयना एक्स्प्रेस कर्जत स्थानकावर दाखल झाली. गाडी प्लॅटफार्मवर थांबत असतानाच एका डब्ब्यातून धूर आला. त्याचे प्रमाणही अधिक होते. यामुळे डब्याला आग लागल्याचा समज झाल्याने त्यामागील डब्यातील काही प्रवाशांनी विरूद्ध बाजूला असलेल्या रुळावर उड्या मारल्या. आरडाओरड आणि पळापळ झाली. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, सुरक्षा जवानही घटनास्थळी आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने ब्रेक यंत्रणेची तपासणी केली. त्यात कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट होताच गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.