कोल्हापूर : राज्यातील १ कोटी ७० लाख कटुंबांना आता स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने ५१ कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांच्या निधीला सुधारित मान्यता देण्यात आली.
रेशन व्यवस्थेचे प्रशासकीय सर्व कामकाज ऑनलाईन झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय ३० डिसेंबर २०२४ रोजी घेतला होता. सध्याचे रेशन कार्ड हाताळण्यास अवघड असल्याने तसेच ते कागदी असल्याने फाटणे, खराब होण्याची शक्यता असल्याने क्यूआर कोडसह स्मार्ट कार्ड देण्यास राज्य मंत्रिमंडळाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता दिली. यानंतर या योजनेला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यता दिली.
या योजनेसाठी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ४८ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता प्रतिकार्ड ३० रुपये ४७ पैसे या दराप्रमाणे ५१ कोटी ७९ लाख रुपयांच्या प्रस्तावाला सुधारित मान्यता दिली. त्यानुसार आता लवकरच नागरिकांच्या हाती पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्ससारखेच स्मार्ट कार्ड स्वरूपात रेशन कार्डही मिळणार आहे.