कासारवाडी : मादळे (ता. करवीर) येथील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणार्या खिचडीच्या पाकिटात बारीक दगड आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. याबाबतची ऑनलाईन तक्रार पालकांनी प्रशासनाकडे केली होती.
शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा महिन्यांपासून तीन वर्षे वयाच्या बालकांना अंगणवाडीतून एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी पुरवली जाते. काही महिन्यांपूर्वी या खिचडीच्या पाकिटामध्ये बारीक दगड असल्याचे व इतर घटक असल्याचे मादळे येथील अमिर पटेल या पालकाच्या लक्षात आले. त्यांनी याची तक्रार आपले सेवा सरकार या ऑनलाईन पोर्टलवर संबंधित प्रशासनाकडे केली. याची तपासणी शुक्रवारी संबंधित पालकांच्या घरी केली असता पुरवलेल्या खिचडीच्या पाकिटात बारीक दगड आढळून आले. याचा भुये येथील पर्यवेक्षक शुभांगी बुवा यांनी संबंधित पुरवठादाराला बोलावून पंचनामा केला व त्यांनी पाकिटे बदलून दिले. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करत पालकांनी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पालकांनी यावेळी केली. दरम्यान, खिचडीची पाकिटे पुणे येथील कंपनीत पॅकिंग होतात. आम्ही फक्त पुरवठा करतो, असे संबंधित पुरवठादाराने स्पष्ट केले.