एकनाथ नाईक
कोल्हापूर : साखर उत्पादनात पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर असला, तरी कोल्हापुरी गुळाचा डंका महाराष्ट्रसह देशभरात आहे. अविट गोडीच्या कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकनही मिळाले आहे. कोल्हापुरी गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असताना गूळ उत्पादन करणारे व्यावसायिक अनेक समस्यांनी ग्रासले आहेत.
जिल्ह्यात आविट गोडीच्या कोल्हापुरी गुळाचा उद्योग पावणे तीनशे वर्षांपासून राज्यासह देशाची गुळाची गरज भागवत आहे. जीआय मानांकनामुळेही यामध्ये कमालीची मागणी वाढली आहे; पण अलीकडच्या काळात गुर्हाळघरांना कामगार, उत्पादन खर्च, कर्नाटकी भेसळयुक्त गुळाची विक्री अशा समस्यांना तोड द्यावे लागत आहेत. जिल्ह्यात 15 वर्षांपूर्वी 1000 च्या आसपास असणारी गुर्हाळघरांची संख्या गतसाली 150 वर आली होती. जिल्ह्यात आता केवळ 80 गुर्हाळघरांची धुराडी पेटली आहेत.
एका बाजूला गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असताना गुर्हाळे बंद पडू लागल्याने त्याचा परिणाम आता बाजार समित्यांतील गूळ सौद्यांवर होत असल्याचे दिसून येत आहे. गुळात साखरेची भेसळ करून कोल्हापुरी गुळाला दराचाही फटका बसल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
गुळाचा प्रतवारीनुसार दर...
गुळाचा दर प्रतवारीनुसार 3800 ते 4900 रुपये क्विंटल आहे. दररोज 5 आणि 10 किलो वजनाचे 20 ते 25 हजार रवे, तर 1 किलोचे 10 हजार छोटे रवे सौद्यासाठी येतात.
आता 24 तासांत 3 आदणे
पूर्वी 25 तासांत 6 आदणे होत होती. सध्या जास्तीत जास्त 4 आदणे निघत आहेत. अपवादात्मक गुर्हाळात रात्री गूळ उत्पादन होते.
साखरमिश्रित गुळावर आळा महत्त्वाचा
कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली कर्नाटकी साखरमिश्रित गूळ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत आहे. परिणामी, कोल्हापुरी गुळाच्या गुणवत्तेला फटका बसत आहे. त्यामुळे साखरमिश्रित गुळाच्या विक्रीवर आळा आणणे गरजेचे आहे.