कोल्हापूर : ‘आम्ही कोल्हापुरी मतदान लय भारी’, ‘कोल्हापूर कसं, चांगल्या उमेदवाराला मतदान देणार तसं’, ‘स्त्रीभू्रण हत्या थांबवा’, ‘झाडे लावा झाडे जगवा’ या व अशा शुभसंदेशांसह जनजागृती करणार्या बाल स्केटिंगपटूंनी तमाम कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले. निमित्त होतं दैनिक ‘पुढारी’च्या वर्धापनदिनाचे.
प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शुभसंदेश स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे यंदा 41 वे वर्ष होते. रॅलीची सुरुवात ऐतिहासिक बिंदू चौकातून सकाळी साडेदहा वाजता, पोलिस वाहतूक निरीक्षक राजाराम बर्गे, संभाजी रणदिवे, संजय काटकर यांच्या उपस्थितीत झाली. शहरातील बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका चौक, भाऊसिंगजीरोड मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.
दैनिक ‘पुढारी’भवन येथे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, राजवीर जाधव यांच्या हस्ते रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अॅड. धनंजय पठाडे, जयेश ओसवाल, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते रॅलीत सहभागी स्केटिंगपटूंचा सत्कार करण्यात आला.
रॅलीत सहभागी पालक व स्केटिंगपटू असे : श्रवण झोके, युवान तावडे, श्रीशा भोई, जीविका घोरपडे, आरव घोरपडे, तनिष्क कुंभार, शर्विल पाटील, नकुल डागा, नीरज सुतार, तनिष्का हवलदार, देवराज नलवडे, साईराज मोरबाळे, रोहन कांडेकरी, युवराज पांचाळ, कन्हैया जाधव, देवराज डोंगरे, चैतन्य पाटील, आकाश नामोजी, वीरश्री कदम, देवेंद्र कदम, प्रेरणा भोसले यांच्यासह पालक अस्मिता वडे, शिल्पा झोके, शीतल कुंभार, पियुषा सुतार, योगिता घोरपडे, कोमल भुई, आशिष डागा, रिषभ डागा, अमित हवलदार, शशिकांत पाटील, ईशा डागा, रितू डागा, कृष्णराज नलावडे, राजू नलवडे, नुरू नेगी, वैभवी नलवडे, एकनाथ पांचाळ, ज्योतिराम जाधव, दीपक डोंगरे, बळवंत पाटील, गयाबाई लमोनी, सागर मोरबाळे, हर्षला हवलदार, रोहन कांडेकरी, अमित तावडे, अमित भुई, विनायक भुई, सचिन घोरपडे, मुख्याध्यापक हभप बाळासाहेब पाटील (पुंगावकर) सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश कदम, तेजस्विनी कदम, राष्ट्रीय पंच अॅड. धनश्री कदम, सागर कुंभार, अॅड. कृष्णराज नलवडे, राष्ट्रीय कोच भास्कर कदम यांनी संयोजन केले.
जिजाऊ, सावित्रीबाई अन् वारकरी...
स्केटिंग रॅलीत अवघ्या 2 ते 16 वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग होता. अडीच वर्षांचा नकुल डागा मायकल जॅक्सनच्या वेशभूषेत सहभागी होता. याशिवाय राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले अशा वेशांत स्केटिंगपटू सहभागी झाले होते. ह .भ. प. विवेकानंद वासकर आध्यात्मिक व शैक्षणिक गुरुकुलच्या स्केटिंग खेळाडूंनीही वारकरी वेश परिधान करून सहभाग घेतला होता. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये विजेतेपदक मिळालेले खेळाडू आपल्या पदकांसह सहभागी झाले होते.