राधानगरी जलाशयाचा निसर्गरम्य परिसर 
कोल्हापूर

Ramsar wetlands India | रामसर दर्जासाठी राधानगरीसह 6 पाणथळ निश्चित

उजनी, जायकवाडी, तानसा, नवेगाव, तोतलाडोह जलाशयांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेल्या सहा महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील रामसर स्थळाचा दर्जा मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये पश्चिम घाटातील महत्त्वाचा ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या राधानगरी जलाशयाचा समावेश आहे. नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने या संदर्भात वन विभागाला सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राधानगरीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे जायकवाडी पक्षी अभयारण्य, ठाण्याचे तानसा वन्य जीव अभयारण्य, गोंदियातील नवेगाव तलाव, नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह धरण आणि सोलापूरचे उजनी धरण या सहा जलाशयांची निवड या पाणथळ जागांसाठी करण्यात आली आहे.

देशात 98 रामसर स्थळे

यापूर्वी राज्यातील लोणार सरोवर, नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य या तीन स्थळांना हा बहुमान मिळाला असून, आता या नवीन सहा स्थळांचा समावेश केला जाणार आहे. जगभर 2.5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारी 2, 400 हून अधिक रामसर स्थळे नियुक्त केली आहेत. जानेवारी 2026 पर्यंत भारतात 13,60,805.63 हेक्टर क्षेत्र व्यापणारी 98 रामसर स्थळे आहेत.

पाणथळ संरक्षणासाठी इराणमधील रामसर शहरात झाला होता करार

रामसर म्हणजे जगभरातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेला एक विशेष करार आहे. 2 फेब्रुवारी1971 रोजी इराणमधील रामसर या शहरात हा ऐतिहासिक करार स्वीकारण्यात आला, म्हणून याला रामसर करार असे संबोधले जाते. ज्या पाणथळ क्षेत्रांना रामसर स्थळ म्हणून घोषित केले जाते, त्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होते. या करारानुसार अशा जागांवरील दुर्मीळ पक्षी, प्राणी, वनस्पती आणि पाणी साठवणुकीच्या नैसर्गिक परिसंस्थेचे रक्षण करणे संबंधित देशावर बंधनकारक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT