वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ Pudhari FIle Photo
कोल्हापूर

आरोग्य विभागातील बोगस औषधांची एसआयटी चौकशी

मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात विशाल एंटरप्रायजेस या कंपनीने बोगस औषध पुरवठा केल्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापुरात शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते. दै. ‘पुढारी’मध्ये 14 डिसेंबर रोजी ‘राज्यात बनावट औषधांचे कोल्हापूर कनेक्शन’ असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत मंत्री मुश्रीफ यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, औषध पुरवठा शासन करत नाही. त्यासाठी हाफकीन संस्था निर्माण केली. मात्र त्यांच्याकडून औषध पुरवठा होत नसल्याने प्राधिकरण निर्माण केले आहे. औषधाची खरेदी सेंटरला होत नाही. हाफकीन आणि प्राधिकरण औषध खरेदी करत होते. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाचा निधी अधिष्ठाता यांच्याकडे दिला आहे. आता अधिष्ठाता आणि जिल्हा नियोजनचे अधिकार जिल्हाधिकारी यांना खरेदीचे अधिकार दिले आहेत.

राज्यात नांदेड, नागपूर, धाराशिव, बीड, भिवंडी, अंबेजागाई, वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयांत तर कोल्हापूर, सिंधूदुर्ग येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बनावट औषधांचा साठा सापडला आहे. ही औषधे कोल्हापूर येथील विशाल एंटरप्राईजेसकडून पुरविण्यात आली आहेत. यात लो क्वालिटी अँटिबोयोटिक्स औषधांचा समावेश आहे. या प्रकरणाचा छडा दै. ‘पुढारी’ने लावला. यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल मंत्री मुश्रीफ यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करणार आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT