तानाजी खोत
कोल्हापूर : कोल्हापूरची गुजरी आणि हुपरीची बाजारपेठ एका ऐतिहासिक वळणावर उभी आहे. ज्या चांदीला काही वर्षांपूर्वी गरिबांचे सोने म्हटले जायचे, तिने आज 2,05,000 रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडून मध्यमवर्गीयांच्या कपाळावर आठ्या आणल्या आहेत; पण ही केवळ दरवाढ नाही; हा एका मोठ्या जागतिक घडामोडींचा परिणाम आहे.
मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त गणित
जागतिक बाजारपेठेत चांदीचा खेळ हा डिमांड-सप्लाय गॅपवर आधारलेला आहे. ‘वर्ल्ड सिल्व्हर सर्व्हे 2025’च्या आकडेवारीनुसार, यावर्षी चांदीची जागतिक मागणी 1,200 दशलक्ष औन्स आहे, तर पुरवठा केवळ 1,050 दशलक्ष औन्स आहे. 150 दशलक्ष औन्सची तफावत चांदीच्या दरांना सोन्याच्या तुलनेत अधिक वेगाने पुढे नेत आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे, चांदीचा इंडस्ट्रियल वापर. कोल्हापूरच्या गुजरीत बसलेला ग्राहक जरी दागिन्यांचा विचार करत असला, तरी जागतिकस्तरावर चांदीचा 59 टक्के वापर आता सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेटा सेंटर्समध्ये होत आहे. एका इलेक्ट्रिक कारमध्ये जवळपास 25 ते 50 ग्रॅम चांदी लागते. जशी जगाची पावले ‘ग्रीन एनर्जी’कडे पडत आहेत, तशी चांदीची भूक वाढत चालली आहे.
हुपरीमध्ये सध्याचे चित्र विदारक
देशातील चांदीच्या दागिन्यांची मोठी गरज भागवणार्या हुपरीमध्ये सध्या चित्र विदारक आहे. हुपरी परिसरात सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शीतल पोतदार यांनी सांगितले की, चांदीच्या दरवाढीमुळे खेळते भांडवल कोलमडले आहे. पूर्वी 10 लाख रुपयांत 10 किलो चांदी घेता येत होती, आज त्यासाठी 20 लाख रुपये लागतात. बँकांकडून कर्जमर्यादा वाढवून मिळत नाहीये, त्यामुळे अनेक कारखान्यांचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो म्युनिफॅक्चरिंग आर्टफॅक्ट्स क्षेत्राला. कोल्हापुरी साज, ठुशी आणि जड पैंजणांची जागा आता लाईट वेट आणि इमिटेशन दागिन्यांनी घेतली आहे. कारागिरांच्या हाताला काम कमी झाले असून, अनेकांनी पारंपारिक व्यवसायाऐवजी इतर रोजगाराचा शोध सुरू केला आहे. सामान्य ग्राहकाची घुसमट लग्नसराईत चांदीचे पैंजण आणि भेटवस्तू देणे ही परंपरा आहे. मात्र, सध्या एका जोडी पैंजणाची किंमत पूर्वीच्या 10-12 हजारांवरून 20-22 हजारांवर गेली आहे. यामुळे सामान्य ग्राहक आता चांदीच्या शुद्धतेशी तडजोड करताना दिसत आहे किंवा चांदीच्या ऐवजी कमी वजनाच्या दागिन्यांकडे वळला आहे.
थोडक्यात सांगायचे तर, चांदी आता कपाटात ठेवण्याचा दागिना न राहता, जागतिक अर्थव्यवस्थेचे इंधन बनली आहे. कोल्हापूरच्या चांदी उद्योगाला टिकवायचे असेल, तर आता कारागिरांना तंत्रज्ञानाची जोड आणि डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. कोल्हापूरातील चांदी उत्पादक व्यापारी जयेश ओसवाल यांनी सांगितले, चांदीच्या वस्तू आणि पुजा साहित्याची निर्मिती करणार्या शेकडो कारागिरांकडे आज काम नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक कुशल कारागीर आता रिक्षा चालवणे किंवा वडापावची गाडी लावणे असे श्रमाचे काम करत आहेत. एका अंदाजानुसार कोल्हापूरात 20 ते 22 हजार कामगार काम करत आहेत.
चांदीचे भविष्य काय?
तज्ज्ञांच्या मते, 2026 पर्यंत चांदी 2.5 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. हे केवळ सट्टेबाजीमुळे नाही, तर चांदीची खान उपलब्धता कमी होत असल्यामुळे होत आहे. जगात 70 टक्के चांदी ही तांबे आणि जस्ताच्या खाणीतून ‘बाय-प्रॉडक्ट’ म्हणून मिळते. त्यामुळे चांदीचे उत्पादन एकाएकी वाढवणे अशक्य आहे.