कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या प्रचंड घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमती सध्या ‘रोलर कोस्टर राईड’वर स्वार झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी मोठी घसरण अनुभवल्यानंतर शुक्रवारी (दि. 23) सोन्या-चांदीच्याा दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे गुरुवारी बाजार काहीसा शांत झाला होता. त्यामुळे सोन्याचा दर 1 लाख 55 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आला होता, तर चांदीने 25 हजारांची गटांगळी खात 3 लाख 10 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र, ही घसरण औटघटकेचीच ठरली आहे. शुक्रवारी बाजार उघडताच पुन्हा मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 4,500 रुपयांनी वाढ होऊन दर 1 लाख 60 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीच्या दरातही मोठी सुधारणा झाली असून, एकाच दिवसात किलोमागे 26 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदी आता 3 लाख 36 हजार रुपये प्रतिकिलोवर स्थिर झाली आहे. लग्नसराईच्या काळात होत असलेल्या या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. सोने-चांदीचे हे दर जीएसटीसह आहेत.