तानाजी खोत
कोल्हापूर : जानेवारी २०२६ मध्ये ४ लाख २० हजार रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा गाठून ग्राहकांचे डोळे पांढरे करणारी चांदी अवघ्या दहा महिन्यांत ६० टक्क्यांनी घसरून १ लाख ६४ हजार रुपयांच्या (एमसीएक्स) घरात आली आहे. या अडीच लाख रुपयांच्या उलथापालथीमागे परदेशातील खाणींपासून लंडन-न्यूयॉर्कच्या शेअर बाजारापर्यंत चालणारा मोठा जागतिक खेळ दडलेला आहे.
जगातील ७० टक्के चांदी स्वतंत्र खाणीतून नव्हे, तर तांबे, जस्त आणि शिस्याच्या खाणींत 'उप-उत्पादन' म्हणून निघते. मेक्सिको, पेरू आणि चीनमधून निघणारी ही कच्ची चांदी स्वित्झर्लंड, लंडन किंवा दुबईतील रिफायनरींमध्ये ९९.९ टक्के शुद्ध होऊन तिची ३० किलोची वीट बनते. भारताची ९० टक्के गरज आयातीवर अवलंबून असल्याने या विटा विमानाने मुंबई, अहमदाबादला उतरून सराफ बाजारात पोहोचतात.
वर्षाच्या सुरुवातीला युद्धजन्य स्थिती, चीनचे निर्यात निर्बंध आणि सोलर-ईव्ही क्षेत्रामुळे तुटवडा भासणार असल्याच्या भीतीतून सट्टेबाजांनी चांदी चार लाखांपार नेली. चांदीचा भाव लंडन आणि न्यूयॉर्कच्या बाजारात संगणकावर ठरतो, जिथे प्रत्यक्ष साठ्यापेक्षा शंभरपट अधिक वायदेबाजारातील 'कागदी सट्टा' खेळला जातो. मात्र, चांदी महाग होताच सोलर कंपन्यांनी स्वस्त पर्याय शोधले. चीनमधील मंदी आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने बड्या हेज फंडांनी एकत्रित नफावसुली सुरू केली. वायदे बाजारातील हा फुगा फुटताच दर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले.
स्क्रीनवरचा व दुकानातील दर वेगळा का?
जानेवारीत कागदी एमसीएक्स वायदे दर (४.२० लाख रुपये) प्रत्यक्ष बाजारापेक्षा (३.७९ लाख) ४१ हजारांनी जास्त होता. मात्र, गुरुवारी १९ नोव्हेंबरला हे चित्र उलटले आहे. सट्टेबाजी ओसरल्याने एमसीएक्स दर १.६४ लाखांवर आला, तरी लग्नसराईची मागणी, जीएसटी आणि आयात खर्चामुळे दुकानांत चांदी १.८० लाख म्हणजेच १६ हजारांनी महाग विकली जात आहे.
भारत ९० टक्के आयातीवर अवलंबून
जगातील निम्म्याहून अधिक चांदी फक्त मेक्सिको, पेरू आणि चीनमधून निघते; त्यामुळे या देशांतील घडामोडींचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो. भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक असला, तरी राजस्थानमधील काही खाणींचा अपवाद वगळता आपल्याकडे उत्पादन नगण्य आहे. त्यामुळे भारताची ९० टक्क्यांहून अधिक गरज स्वित्झर्लंड, लंडन, हाँगकाँग आणि यूएईमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे.