कोल्हापूर : बदललेली जीवनशैली, वाढता मानसिक ताण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे होणारा ‘स्ट्रोक’ हा आजार आता ‘सायलेंट किलर’ बनून समोर येत आहे. राज्यात स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांची चिंताजनक वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असून, गेल्या तीन वर्षांत स्ट्रोकमुळे 397 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मेंदूवर होणारा हा छुपा हल्ला वेळेत ओळखला न गेल्यास मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना आणि जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
(एफ) फेस : रुग्णाला हसण्यास सांगा. चेहर्याची एक बाजू लुळी पडल्यास किंवा ओठ वाकडे झाल्यास हे स्ट्रोकचे लक्षण आहे.
(ए) आर्म : रुग्णाला दोन्ही हात समोर उचलण्यास सांगा. एक हात खाली पडत असेल किंवा उचलता येत नसेल, तर हा धोक्याचा इशारा आहे.
(एस) स्पीच : रुग्णाला एखादे सोपे वाक्य बोलण्यास सांगा. बोलताना जीभ अडखळत असेल किंवा शब्द अस्पष्ट येत असतील, तर मेंदूत अडथळा असू शकतो.
(टी) टाईम : वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास वेळ न घालवता तातडीने रुग्णालयात दाखल करा किंवा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा.
स्ट्रोक आल्यानंतरचे पहिले तीन ते साडेचार तास ‘गोल्डन अवर’ म्हणून ओळखले जातात. या काळात रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यास ‘थ्रोम्बोलिसिस थेरपी’ द्वारे रक्ताची गुठळी विरघळवणारी औषधे देता येतात. यामुळे मेंदूचे होणारे नुकसान टाळता येते आणि रुग्णाला मृत्यू किंवा अपंगत्वाच्या धोक्यातून वाचवता येते.
अयोग्य आहार : फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन.
व्यसनाधीनता : धूम्रपान आणि मद्यपानाचे वाढते प्रमाण.
शारीरिक निष्क्रियता : व्यायामाचा पूर्णपणे अभाव.
मानसिक आरोग्य : कामाचा ताण, नैराश्य आणि अपुरी झोप.
इतर आजार : उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्टेरॉल यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करणे