Drought News Admin.WS
कोल्हापूर

Kolhapur Drought | संपूर्ण कोल्हापूर जिल्‍हा दुष्काळी ठरण्याचे संकेत

हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीरच्या सर्वेक्षणासाठी प्रशासन झाले सज्‍ज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : २५ सप्टेंबरच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड आणि पन्हाळा या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला. यानंतर ऑक्टोबरमध्ये जाहीर दुसऱ्या यादीत शाहूवाडी आणि शिरोळ या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला. १२ पैकी ८ तालुक्यांत दुष्काळ घोषित केल्यानंतर उर्वरित चार तालुक्यांचेही सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. या चार तालुक्यांतही दुष्काळ जाहीर झाला, तर संपूर्ण जिल्‍हाच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्‍ज; दिवसभर आदेशाची प्रतीक्षा

दुष्काळी घोषित करण्‍याची मागणी होत असलेल्या हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर या तालुक्यांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. बुधवारी (दि. १८) सकाळपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र, दिवसभरात याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. हे आदेश प्राप्त होताच सर्वेक्षण सुरू होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारी (दि. १८) झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांनुसार संपूर्ण सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला त्याबाबतचे पत्र तत्काळ दिले जाईल, असे मंगळवारीच सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. यानंतर संबंधित प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी मंडल अधिकारी, तलाठी यांची बैठक घेऊन आदेश प्राप्त होताच सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वेक्षणाबाबतचे आवश्यक ते सर्व आदेश काढण्यात आले.

बुधवारी सकाळी सर्वेक्षणाबाबतचे आदेश प्राप्त होतील, अशी शक्यता होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडे आले नाहीत. यामुळे बुधवारी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली नाही. उद्या, गुरुवारपर्यंत याबाबतचा आदेश प्राप्त होईलच. दरम्यान, आदेश प्राप्त होताच तत्काळ सर्वेक्षण सुरू केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT