Siddhnerli Samadhan camp: सिद्धनेर्लीतील ‘समाधान’ शिबिरात जनतेचा संताप; मंत्री व वरिष्ठ अधिकारी गेल्यानंतर स्टॉल रिकामे Pudhari
कोल्हापूर

Siddhnerli Samadhan camp: सिद्धनेर्लीतील ‘समाधान’ शिबिरात जनतेचा संताप; मंत्री व वरिष्ठ अधिकारी गेल्यानंतर स्टॉल रिकामे

शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘समाधान शिबिर’ सिद्धनेर्लीत केवळ औपचारिकता ठरल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

सिद्धनेर्ली : शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘समाधान शिबिर’ सिद्धनेर्लीत केवळ औपचारिकता ठरल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. महसूल विभागाच्या वतीने आयोजित या शिबिरात सकाळी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला; मात्र त्यानंतर अनेक स्टॉल रिकामे झाल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परतावे लागले.

सकाळच्या सत्रात मंत्री हसन मुश्रीफ, पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्याचा उद्देश या शिबिरामागे होता. महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले होते.

शिबिरात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळातच अनेक स्टॉलवरील कर्मचारी निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आपल्या समस्या, दाखले किंवा अर्जांसाठी आलेल्या अनेकांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला नाही.

काही नागरिकांनी सांगितले की, स्टॉलवर चौकशी केली असता “कार्यालयात येऊन भेटा” असे सांगण्यात आले. यामुळे लांबून आलेल्या नागरिकांचा वेळ व खर्च वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि शेतकऱ्यांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याचेही काहींनी सांगितले.

दरम्यान, शिबिरात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवाव्यात आणि शिबिरातून किती जणांच्या समस्या मार्गी लागतात याचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर काही तासांतच अनेक स्टॉल बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. या घटनेमुळे अशा शिबिरांचा उद्देश प्रभावीपणे साध्य होण्यासाठी संबंधित विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

शिबिराबाबत नागरिकांच्या तक्रारी

  • मंडप व जाहिरातींसाठी मोठा खर्च झाल्याची चर्चा

  • अनेक स्टॉल दुपारनंतर बंद असल्याची नागरिकांची तक्रार

  • “कार्यालयात या” असे सांगून काहींना परत पाठवले

  • लांबून आलेल्या नागरिकांचा वेळ व खर्च वाया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT