Shrimantha Bazaar scam | श्रीमंता बाजार घोटाळाप्रकरणी सूत्रधार महिलेच्या घरावर छापा 
कोल्हापूर

Shrimantha Bazaar scam | श्रीमंता बाजार घोटाळाप्रकरणी सूत्रधार महिलेच्या घरावर छापा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्रीमंता बाजार कंपनीतील साडेतीन कोटींच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या सूत्रधार वैशाली काशिनाथ गुरव (वय 34, रा. हलकर्णी, ता गडहिंग्लज) हिच्या हलकर्णी येथील घरावर तपास पथकाने मंगळवारी छापा टाकला. तीन तासांहून अधिक काळ झडती घेण्यात आली. दोन आलिशान मोटारींसह स्थावर मालमत्तेसंदर्भात कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत झडती सुरूच होती.

श्रीमंता बाजार कंपनीतील घोटाळाप्रकरणी कंपनीची मुख्य एजंट तथा कंपनीतील आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळणार्‍या वैशाली गुरव हिला चार दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील फ्लॅटवर छापा टाकून जेरबंद केले होते. गुरव हिच्या विरोधातील पुरावे शोधण्याची मोहीम गतीने सुरू आहे. पोलिस कोठडी होऊनही तपासात असहकार्य करणार्‍या महिलेच्या हलकर्णी येथील घरावर आर्थिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ निरीक्षक महेश इंगळे यांच्यासह पथकाने छापा टाकला. झडतीत वैशाली गुरव हिच्या नावावरअसलेल्या काही मालमत्तांची कागदपत्रे तसेच 30 लाख रुपये किमतीच्या दोन आलिशान मोटारींचे पथकाला धागेदोरे लागले आहेत.

दोन्हीही मोटारींचे संशयित महिलेने व्यवहार केल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी संबंधितांशी संपर्क साधून दोन्हीही मोटारी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैशाली गुरव हिच्या काही नातेवाईकांसह विश्वासू साथीदारांचीही नावे चौकशीतून पुढे आली आहेत. त्यांचीही कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. छापा आणि झडती पथकात हवालदार विजय काळे, प्रवीण पाटील, रवी गायकवाड, बाबूमियॉ काझी, राहुल गायकवाड यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT