प्रवीण आजगेकर
गडहिंग्लज : कमी कालावधीत अफाट परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना श्रीमंतीची स्वप्ने दाखवणार्या श्रीमंता बाजार या कंपनीने गडहिंग्लज परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना अक्षरशः कंगाल केले आहे. 34 हजार गुंतवा आणि 75 दिवसांत 54 हजार मिळवा या आकर्षक योजनेच्या जाळ्यात अडकून अनेक मध्यमवर्गीयांनी आपली कष्टाची पुंजी गमावली असून, चार वर्षांनंतरही न्याय मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. यातून श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण गरीब झाले आहेत.
2021 च्या सुमारास गडहिंग्लजच्या मध्यवर्ती ठिकाणी या कंपनीने आपले आलिशान कार्यालय थाटले होते. कार्यालयातील कॉर्पोरेट वातावरण आणि गोड बोलणार्या कर्मचार्यांमुळे लोकांचा विश्वास बसला. विशेष म्हणजे, संचालक मंडळातील लोक स्थानिक असल्याने अनेकांनी डोळे झाकून गुंतवणूक केली. सुरुवातीला काही जणांना वेळेवर परतावा देऊन कंपनीने बाजारात विश्वासार्हता निर्माण केली. ज्यामुळे गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला. गुंतवणूक वाढल्यानंतर काही दिवसांतच परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली. कार्यालयात चकरा मारणार्या गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली आणि हळूहळू फसवणुकीचा उलगडा झाला. ज्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी किंवा उसने पैसे घेऊन येथे गुंतवले होते, त्यांच्यावर पुन्हा गरिबीत जगण्याची वेळ आली आहे.
अनेकजण बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यास पुढे आले नाहीत. मात्र, अखेर 2025 मध्ये याप्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल झाली. सुरुवातीला फसवणुकीचा आकडा 2 कोटींच्या घरात दिसत असला, तरी प्रत्यक्षात ही व्याप्ती अनेक पटींनी मोठी असण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. काही आरोपींना अटक झाली आहे. तरीही गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची आशा धूसरच आहे. श्रीमंता बाजारच्या या गाजलेल्या योजनेने अनेकांची स्वप्ने मोडली आणि एका क्षणात श्रीमंतीची आस गरिबीत बदलली.
आरोपी गजाआड; पण पैसे कधी मिळणार?
पोलिसांनी मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या, तरी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यातून वसुली करण्याची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे संथ गतीने सुरू आहे. ‘आरोपी तर पकडले गेले; पण आमचे पैसे कधी मिळणार?’ हाच प्रश्न आज हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांकडून विचारला जात आहे.