गारगोटी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सादर केलेल्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी सहकार्य करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गारगोटी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मंगळवारी ते आदमापुर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते.
सभापती राम शिंदे म्हणाले, बाळूमामा विकास आराखड्या संदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सादर केलेल्या विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील श्री मौनी विद्यापीठ क्रिडांगणावर सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास ते खासगी हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ते आदमापूर येथील श्री संत बाळूमामा समाधीच्या दर्शनासाठी गेले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व विश्वस्तानी त्यांचे स्वागत केले. तर गारगोटी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, नामदेव चौगुले, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे सुपुत्र विक्रम आबिटकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संग्राम सावंत शहराध्यक्ष रणधीर शिंदे, सरपंच प्रकाश वासकर, उपसरपंच सागर शिंदे, ग्रा. प. सदस्य राहुल चौगुले आदींनी स्वागत केले.