कोल्हापूर : गोकुळला मागील पाच वर्षांत दिलेल्या पत्रांची उत्तरे द्या, अशी मागणी माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रशासक मंडळाकडे केली. सत्ताधार्यांनी पाच वर्षांत उत्तरे दिली नाहीत; आता तुम्ही द्या, तसेच संस्था सभासदांनी जी माहिती मागितली आहे, त्याची सविस्तर माहिती द्या, असेही महाडिक यांनी प्रशासक मंडळास सांगितले.
शौमिका महाडिक यांनी शनिवारी गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी प्रशासक मंडळाची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रशासक मंडळासोबत चर्चा केली. दरम्यान त्यांनी गोकुळ प्रशासनाकडे मागील पाच वर्षांत अनेकवेळा पत्रव्यवहार करत काही माहिती मागविली होती; मात्र बहुतांश पत्रांची माहिती अद्याप मिळालेली नाही. माहिती मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही गोकुळ प्रशासनाकडून माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रशासक मंडळाच्या काळात तरी या पत्रांची उत्तरे गोकुळकडून मिळतील, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली.
संस्था सभासदांना सविस्तर माहिती द्या
प्रशासक मंडळासोबत चर्चा करताना महाडिक यांनी दूध संस्था सभासदांनी काही माहिती मागितली आहे. गोकुळमधील कारभाराची माहिती घेणे हा संस्था सभासदांचा हक्क आहे. त्यामुळे त्यांनी जी काही माहिती मागविली आहे, त्याची सविस्तर माहिती संस्था सभासदांना देण्यात यावी असे महाडिक यांनी प्रशासकांना सांगितले.
निवेदनामागे राजकीय हेतू
दूध संस्था सभासदांनी दिलेल्या निवेदनाबाबत शौमिका महाडिक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, गेली पाच वर्षे गोकुळवर यांचीच सत्ता होती. मग, त्याकाळात गोकुळमधील मागील 25 वर्षांच्या कारभाराची माहिती का मागविली नाही? आताच ही माहिती घेण्याचा साक्षात्कार कसा झाला, या प्रकारामागे राजकीय हेतू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा बँकेत घेतली भेट
दूध संस्था प्रतिनिधींनी जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील कार्यालयात गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्यचे गोकुळमधील काही माजी संचालक उपस्थित होते. दूध संस्था प्रतिनिधींच्या भेटीनंतर माजी संचालकांची बैठक झाल्याचे समजते. सोमवारी पुन्हा बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली.