कोल्हापूर : शिवाजी पार्क येथे आगीमध्ये घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Short Circuit Fire | शॉर्टसर्किटने बंगल्यास आग; लग्न जत्थ्यासह २५ लाखांचे साहित्‍य खाक

शिवाजी पार्क येथील घटना : लाकडी कपाट, टीव्ही, कपडे, फ्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी पार्क येथील बंगल्यास रविवारी रात्री शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये अवघ्या काही दिवसांवर असलेल्या मुलाच्या लग्नाच्‍या जत्थ्यासह प्रापंचिक साहित्य जळूून खाक झाल्‍याने डॉ. रोमा अभय चौगुले यांच्यासह कुटुंबीयांचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

शिवाजी पार्क येथे डॉ. रोमा चौगुले यांचा बंगला आहे. त्यांचा मुलगा डॉ. अजिंक्य याचे लग्न काही दिवसांवर आल्यामुळे त्यांच्या घरी लग्नाची धांदल सुरू आहे. रविवारी चौगुले कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील किचनमधून धूर आल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती चौगुले यांना तसेच अग्निशमन दलास दिली. अवघ्या काही मिनिटांतच ताराराणी चौक, प्रतिभानगर, टिंबर मार्केटचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला यांच्यासह जवान संग्राम मोरे, रमजान पटेल, योगेश कदम, विशांत चव्हाण, शुभम कुंभार, नवनाथ साबळे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, लाकडी कपाट, सिलिंग, टीव्ही, कपडे, फ्रीज, लग्नाचा जत्था असे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच सामाजिक कार्यकर्ते विश्वजित मोहिते, योगेश जाधव, किरण जोंधळे, टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चौगुले कुटुंबीयांना धक्का

डॉ. अजिंक्य चौगुले यांचे लग्न काही दिवसांवर आले असून, चौगुले कुटुंबीय लग्नाची तयारी करण्यात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच बंगल्याचे सुशोभीकरण करून, रंगरंगोटी केली आहे. लग्न जत्थाही खरेदी केला. मात्र, या सगळ्याची रविवारच्या आगीत राख झाली. यामुळे चौगुले कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT