जयसिंगपूर : शिरोळ शहरातील भटक्या कुत्र्याच्या कळपाने येथील पाटील पोल्ट्री फार्म मधील सुमारे २०० देशी कोंबड्यांचा फडशा पाडल्यामुळे युवा शेतकरी अक्षय पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरोळ नगर परिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिरोळ शहरातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यासमोर पाटील पोल्ट्री फार्म नावाने युवा शेतकरी अक्षय पाटील यांचे देशी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म सुरू केला आहे. अक्षय यांनी कोंबड्यांची लहान पिल्ली आणून गेली 6 महिने त्यांना जीवापाड जपले. येत्या 8 दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या.
परंतू रविवारी पहाटे १० ते १२ भटक्या कुत्र्यांनी पोल्ट्रीची जाळी दाताने तोडून पोल्ट्रीत प्रवेश केला व बघता बघता २०० ते २२० कोंबड्यांच्या फडशा पडला. काहींची मुंडकी तोडून टाकली, तर काही कोंबड्यांना फरफटत शेजारील ऊसाच्या शेतात नेले. काही कोंबड्या घाबरून मेल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी पहाटे ५ वाजता नेहमी प्रमाणे अक्षय कोंबड्यांना खाद्य घालण्यासाठी उठले असता.. मृत कोंबड्या आणि रक्तबंबाळ झालेली पोल्ट्री बघून त्या युवा शेतकऱ्याचा जीव धस्स झाला. ८ दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या. लहान पिल्लापासून मोठी कोंबडी होईपर्यंत घेतलेले सर्व कष्ट त्या युवा शेतकऱ्याचे वाया गेले.
भटक्या कुत्र्यांच्या गंभीर प्रश्न शिरोळ शहरात निर्माण झालेला असून, रक्ताची चटक लागलेली ही भटकी कुत्री कधी अशी प्राण्यांना फाडतात, तर कधी माणसांच्या अंगावर जातात. अशा काहीतरी घटना घडल्यावर नगरपरिषदेकडून काहीतरी तात्पुरती उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. परंतू मुख्याधिकारी प्रचंडराव साहेब यांनी सदर प्रश्न गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी मागणी शिरोळ मधील नागरिकांच्यातून होतं आहे.