कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणार्‍या भुयारी मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी कोनशिला अनावरण करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. समवेत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह मान्यवर.  Pudhari File Photo
कोल्हापूर

‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थिनींना अधिकच्या अडीच हजार निधीसाठी प्रयत्न

मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा; शिवाजी विद्यापीठाचे पूर्व-पश्चिम परिसर जोडणार्‍या भुयारी मार्गाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राबवत असलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेची व्याप्ती वाढवून अधिक सशक्त करणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. योजनेंतर्गत काम करणार्‍या विद्यार्थिनींचे कामाचे तास व त्यासाठी देण्यात येणारे शुल्कही वाढवावे. यासाठी खासगी उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. साधारणत: अडीच हजार रुपयांचा अधिकचा निधी विद्यार्थिनींना मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना कायमस्वरूपी जोडणार्‍या भुयारी मार्गाचे उद्घाटन शनिवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्या अनुषंगाने त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांनी देशविदेशांतील विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून आमंत्रित करून त्यांच्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिवाजी विद्यापीठाने विविध परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार केले आहेत, ही चांगली बाब आहे. पुढील काळात याचे प्रमाण वृद्धिंगत करावे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य व सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना जोडणार्‍या भुयारी मार्गाचे काम एक वर्षात पूर्णत्वास गेले आहे. मंत्री पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी भुयारी मार्गाच्या कामाची घोषणा केली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत त्याला आवश्यक निधीची तरतूद करून त्याच्या कामासाठी शासकीय यंत्रणांचे संपूर्ण सहकार्य मिळवून देण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मार्ग अस्तित्वात आला आहे. सुरुवातीला मंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून भुयारी मार्गाचे उद्घाटन झाले. त्यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भुयारी मार्गाची चालत जाऊन पाहणी केली. विद्यापीठ परिसरात लोकांच्या दातृत्वातून साकारत असलेल्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या कामास मंत्री पाटील यांनी भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली.

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, पुण्याच्या अस्टुट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतिनिधी विनायक पारळकर, स्थापत्य कामाचे ठेकेदार रमेश भोजकर, विद्युत कामाचे ठेकेदार श्रीकांत गुजर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. व्ही. एम. पाटील, स्वागत परुळेकर आदी उपस्थित होते.

...तर संबंधित संस्थेवर थेट कारवाई करणार

मुलांना शंभर टक्के उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. परंतु काही संस्था अडवणूक करून पैसे घेत आहेत. याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, अशा संस्थांविरोधात पालक किंवा विद्यार्थ्यांनी तक्रार दिल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. दोन दिवसांपूर्वी बांद्रा येथील एका कॉलेजमध्ये गेलो. 148 मुलांना एक रुपयाही न भरता प्रवेश मिळाला. मोफत शिक्षण दिले जाते की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक आठवड्यास एका कॉलेजला भेट देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT