कोल्हापूर, प्रवीण मस्के : दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शिवाजी विद्यापीठ शाहू संशोधन केंद्रातर्फे 'कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास' हा पाच खंडात ग्रंथ साकारला जात आहे. ग्रंथातून कोल्हापूरचा इत्यंभूत भौगलिक व ऐतिहासिक अनमोल ठेवा जगासमोर येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी 1970 रोजी शाहू संशोधन केंद्राची स्थापना केली. केंद्रामध्ये कोल्हापूरचे राजघराणे व मराठा समाजातील कुटुंबाची एक हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे उपलब्ध आहेत. डॉ. आप्पासाहेब पवार (1536), भाई माधवराव बागल (638), पी. बी. साळुंखे (80), डी. डी. किणीकर, (260), डॉ. जयसिंगराव पवार (285) ग्रंथ, पुस्तके आणि विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर, विद्याविलास, ब्राह्मणेतरचे अंक आहेत.
इतिहास विषयाचे प्राध्यापक व गाढे अभ्यासक डॉ. आप्पासाहेब पवार यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक कुटुंबांची माहिती संकलित करून मूळ ऐतिहासिक दस्ताऐवज शोधून काढले. ताराराणीकालीन कागदपत्रे भाग-1, 2 व 3, याचबरोबर जिजाबाईकालीन कागदपत्रांचे खंड प्रकाशित केले. पुरातत्त्व विभाग आणि इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडन येथून त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्यासंदर्भातील हजारो कागदपत्रे संकलित करून त्याचे संपादन केले. राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स (1884 ते 1894) असा खंड प्रकाशित केला. त्यानंतर 1983 ते 2006 या काळात समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विलास संगवे यांनी संचालकपदाची धुरा हाती घेतली. त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील 8 खंड प्रकाशित केले.
2007 पासून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक आहेत. त्यांनी राजर्षी शाहू साहित्यमाला अंतर्गत श्रीमच्छत्रपती शाहू यांचे चरित्र : प्रो. आण्णासाहेब लठ्ठे, श्री शाहूंचे चरित्र : संस्कृत : वासुदेव लाटकरशास्त्री, महाराष्ट्राचा इतिहास : मांडणी व पुनर्मांडणी, श्रीमंत क्षात्रजगद्गुरू : विचारदर्शन-भाग 1, मेजर ग्रॅहमज स्टॅश्टॅटिकल रिपोर्ट, डॉ. बालकृष्णाज शिवाजी द ग्रेट- खंड 1 ते 4, राजर्षी शाहू महाराज आणि कोल्हापूर चळवळ, शाहू छत्रपती : राजा आणि क्रांतिकारक, महान शिवाजी खंड- 1 व 4 असे ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
शाहू संशोधन केंद्रातर्फे डॉ. जयसिंगराव पवार संपादित'कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास : कोल्हापूर ऐतिहासिक व भौगोलिक- खंड पहिला' प्रकाशनाच्या मार्गावर आहे. यामध्ये कोल्हापूरचा प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक काळापर्यंत ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, शेती, औद्योगिक असे पाच खंड येत्या तीन वर्षांत प्रकाशित केले जाणार आहेत. त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांचे यात लेख असतील. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराराणीपासून ते कोल्हापूरची कला, साहित्य, संस्कृती, संगीत, कुस्ती परंपरा यासह पर्यावरण, जंगले, पक्षी, प्राणी यांची माहिती या खंडांमध्ये असणार आहे.
मोडी भाषेतील दुर्मीळ ग्रंथ लवकरच
शाहू संशोधन केंद्राकडून मराठा इतिहासासंदर्भातील डॉ. आप्पासाहेब पवार यांनी संकलित केलेली 1664 ते 1850 या काळातील मोडी भाषेतील दुर्मीळ कागदपत्रांचा ग्रंथ लवकरच प्रकाशित केला जाणार आहे. इतिहास संशोधक के. जी. सूर्यवंशी याचा 'मल्लविद्या : पौराणिक ते मध्ययुगीन काळ' या 600 पानांच्या मराठी ग्रंथाचे काम सुरू आहे. छत्रपती राजाराम महाराज (1922 ते 1940) यांच्यावरील पाच खंडांचा ग्रंथदेखील शाहू संशोधन केंद्राकडून प्रकाशित होणार आहे.