Shivaji University  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur|कुलसचिवांच्या नियुक्ती, वेतनप्रश्नी न्यायिक अधिकाऱ्यामार्फत चौकशी

Judicial inquiry into Shivaji University registrar appointment- सेवानिवृत्त न्यायाधीश भरत व्यास यांच्यावर जबाबदारी, २० डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या नियुक्ती, वेतननिश्चिती आणि सेवानिवृत्ती वयासंदर्भातील बाबींची आता विद्यापीठ प्रशासनाबाहेरील न्यायिक अनुभवी अधिकाऱ्यामार्फत चौकशी होणार आहे. नागपूरचे सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश भरत व्यास यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांनी याबाबत आदेश काढला आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयाने ७ ऑक्टोबर रोजी शासनाला सादर केलेल्या अहवालात कुलसचिवांच्या नियुक्ती व सेवाविषयक बाबींवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर विविध शिक्षक, राजकीय व सामाजिक संघटनांनी चौकशीची मागणी केली होती. चौकशीत कुलसचिवपदाची नियुक्ती, वेतनश्रेणी, वेतननिश्चिती आणि सेवानिवृत्तीचे वय तपासले जाणार आहे. चौकशीशी संबंधित नस्त्या व सेवाविषयक कागदपत्रे पंचनामा करून सीलबंद केली जातील. ती सहायक कुलसचिव सुनीता यादव यांच्या ताब्यात राहतील. कुलसचिवांसह संबंधित संघटनांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

दोन टप्प्यांत अहवाल

चौकशीचे निष्कर्ष दोन टप्प्यांत येतील. वेतनविषयक बाबी व चौकशीदरम्यानच्या अंतरिम व्यवस्थेबाबतचा पहिला अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. सर्व मुद्द्यांवरील अंतिम अहवाल २० डिसेंबरपर्यंत बंद लिफाफ्यात कुलगुरूंकडे सादर होणार आहे.

निष्कर्षापूर्वी कोणतेही मत नाही

चौकशी तथ्ये तपासण्यासाठी असून ती शिस्तभंगाची कारवाई नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अहवाल येईपर्यंत विद्यापीठाने कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. शासनाचे अधिकार व संबंधित अधिकाऱ्यांचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवून ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT