प्रवीण मस्के
कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उर्मिला पोळ यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास ‘महिला सुरक्षा ॲप’ विकसित केले आहे. अँड्रॉइडमधून तयार केलेले हे ॲप ‘कोटलीन’ या आधुनिक प्रोग््राामिंग भाषेत विकसित करण्यात आले असून संकटाच्या काळात महिलांसाठी डिजिटल सुरक्षा कवच ठरणार आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी कोल्हापुरातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘महिला सुरक्षा ॲप’ सोपे आणि वापरण्यास सुलभ इंटरफेसवर आधारित आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वेळ न दवडता याचा वापर करता येतो. ॲपमध्ये ‘इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स’ची सुविधा देण्यात आली आहे. युजर हा विश्वासू व्यक्ती किंवा नातेवाईकांचे फोन क्रमांक ॲपमध्ये जतन करू शकतो. संकटाच्या वेळी कोणाला फोन करायचा यासाठी शोधाशोध करावी लागू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय ॲपमध्ये ‘शेक टू एसओएस’ ही विशेष सुविधा आहे. भिती किंवा घाईच्या प्रसंगी फोन अनलॉक करून बटन दाबणे शक्य नसल्यास केवळ फोन तीन वेळा हलविल्यास (शेक) ॲप आपोआप सक्रिय होते आणि संकटाचा संदेश लोकेशनसह पाठवते. ही सुविधा महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच ॲपच्या मुख्य स्क्रीनवर पोलिस (100), आपत्कालीन सेवा (112) आणि रुग्णवाहिका (108) यासारखे महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे एका क्लिकवर शासकीय यंत्रणेशी संपर्क साधता येणे शक्य होणार आहे.
‘ग्रीन बटन’ दाबल्यास तातडीने संदेश जाणार
महिला सुरक्षा ॲपमध्ये ‘ग््राीन बटन’ ही खास सुविधा देण्यात आली आहे. महिलेला संकटाची जाणीव होताच हे बटन दाबल्यावर जतन केलेल्या संपर्कांना तातडीने संदेश पाठवला जातो. या संदेशामध्ये महिलेचे लाईव्ह लोकेशन ‘गुगल मॅप’ लिंकद्वारे पाठवले जाते. त्यामुळे मदत करणाऱ्या व्यक्तींना अचूक ठिकाण समजून त्वरित पोहोचणे शक्य होते.
तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता मानवी सुरक्षिततेसाठी व्हावा, या उद्देशाने हे महिला सुरक्षा ॲप विकसित केले आहे. महिलांना एकट्याने प्रवास करताना किंवा रात्री बाहेर पडताना या ॲपमुळे त्यांना आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीव होईल. महिलांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक क्षेत्रातून पुढाकार घेत विकसित करण्यात आलेले ॲप महिलांसाठी उपयोगी ठरेल.- डॉ. उर्मिला पोळ, सहयोगी प्राध्यापक, संगणकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ