कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील डिप्लोमा, पीजी डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठ अधिविभागस्तरावर एक जून तर महाविद्यालयामध्ये 15 जूनपासून सुरू होणार आहेत.
विद्यापीठाकडून डिप्लोमा, पीजी डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार महाविद्यालय स्तरावरील परीक्षा 15 ते 25 जून याकालावधीत होतील. विद्यापीठ अधिविभागाच्या परीक्षा 1 ते 15 जूनपर्यंत चालतील. परीक्षेचे वळापत्रक तयार करणे, वेळापत्रक प्रसिद्ध करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन व नियोजन करून सुरळीतपणे पार पाडण्याची संबंधित महाविद्यालय, अधिविभाग यांच्यावर जबाबदारी असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी-सवलती असतील. त्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे अधिक वेळ दिला
जाईल. विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगीने लेखनिक, सहायक घेता येईल. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
विद्यापीठाकडून मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील पदवी स्तरावरील सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष सत्र (1,2, 3 व 4) परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जाणार आहेत. बी.ए., बी.बी.ए., बी.ए. (मल्टीमीडिया, डिफेन्स स्टडी इतर बी.व्होक सर्व परीक्षा) व बी.कॉम. बी.सी.ए., बी.कॉम (बिझनेस मॅनेजमेंट, बँक मॅनेजमेंट व इतर) प्रथम वर्ष सत्र 1 व 2 परीक्षा 25 मे ते 10 जून तर द्वितीय वर्ष सत्र 3 व 4 च्या परीक्षा 1 ते 20 जून या कालावधीत होतील. बी. एस्सी. बी.सी.ए. बी.एस्सी. (बायो-टेक शुगरटेक, आयटी. व इतर) अभ्यासक्रम प्रथम वर्ष सत्र-1 व 2 परीक्षा 1 ते 20 जून तर द्वितीय वर्षातील सत्र3 व 4 च्या परीक्षा 7 ते 25 जून दरम्यान होतील.