कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून डिजिलॉकरमध्ये तब्बल 9 लाख विद्यार्थ्यांची डिग्री अपलोड!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यकाळाचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने नॅशनल अ‍ॅकॅडेमिक डिपाझिटरी कक्ष सुरू केला आहे. याअंतर्गत 'डिजिलॉकर'मध्ये पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांची आजअखेर 9 लाख 14 हजार 328 पदवी प्रमाणपत्रे अपलोड केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची व्हेरिफिकेशनची अडचण दूर झाली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यापीठाने अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून केली आहे. टप्प्याटप्प्याने धोरणाचा परिघ विस्तारला जाणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना दुबार गुणपत्रिका पूर्णपणे ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे प्रदान करण्यास यंदापासून प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यापीठात 2020 मध्ये नॅशनल अ‍ॅकॅडेमिक डिपाझिटरी कक्ष (नॅड) सुरू झाला आहे. कक्षाच्या वतीने 2002 ते 2023 या कालावधीमधील सुमारे 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये अपलोड केली आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचा 'एबीसी-आयडी' काढण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देश व देशाबाहेरील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे व बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरीसाठी पदवी प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनची मोठी समस्या दूर झाली असून वेळ आणि पैशाचीही बचत झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार डिजिलॉकर व अ‍ॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट पोर्टल सुरू झाले आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत नवीन गोष्टी सुरू करण्यात विद्यापीठ आघाडीवर आहे.
– डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT