कोल्हापूर : उच्च शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पदवी प्रमाणपत्र हातात घेतानाचा क्षण मनाच्या कप्प्यात साठवणार्या तरुणाईच्या उत्साह, आनंद अन् अभिमानाने शुक्रवारी शिवाजी विद्यापीठ कॅम्पस बहरला. सकाळपासून विद्यापीठाच्या निसर्गरम्य कानाकोपर्याने विविध विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांच्या चैतन्यदायी सहवासाची अनुभूती घेतली. पदवी प्रमाणपत्र मिळाल्याचा क्षण कॅमेर्यात कैद करणारे तरुणाईचे ग्रुप, आई-वडिलांना पदवी प्रमाणपत्र दाखवणारे व्हिडीओ कॉल्स, प्रमाणपत्रातील शब्द वाचणारी कुतूहलाची नजर आणि भविष्यातील स्वप्नांचा वेध घेणार्या डोळ्यातील बोलके भाव अशा वातावरणाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणालाही तारुण्याची झालर मिळाली. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभाचे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडे येणारे कॅम्पसमधील रस्ते तरुणाईने फुलून गेले. कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विविध भागांतील विद्यार्थी प्रमाणपत्रे स्वीकारण्यासाठी दाखल होत होते. ग्रुप करून तरुणाई जिजाऊ सभागृहाकडे येत होती. आज पदवी मिळणार ही भावना प्रत्येकाच्या चेहर्यावरील चमक वाढवणारी दिसत होती. विविध विद्या शाखांच्या पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनाची पदवी प्रमाणपत्रे स्वीकारताना विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला जाणारा आनंदोत्सव, प्रमाणपत्रासह हा क्षण कॅमेर्यात टिपण्यासाठी चाललेली धडपड, बर्याच वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या कॉलेज जीवनातील रंगलेल्या आठवणी, गमती-जमती असा माहौल शिवाजी विद्यापीठात पाहायला मिळाला.
परीक्षा भवन क्रमांक दोन येथील आवारात पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याची सोय केली होती. यंदा प्रथमच पदवी प्रमाणपत्रात मराठी व इंग्रजी या दोन भाषांचा समावेश करण्यात आला आहे. परीक्षा विभागाने येथे स्नातकांच्या सोयीसाठी 50 बूथ उभारले होते. शाखानिहाय प्रमाणपत्रे वितरित करण्याची सोय असल्यामुळे संपूर्ण परिसर स्नातकांनी तुडुंब भरला होता. यंदा ज्या बूथवर प्रमाणपत्र मिळणार त्याचा क्रमांक विद्यार्थ्यांना मोबाईल मेसेजद्वारे मिळत असल्याने कुठेही रांग किंवा गर्दी दिसत नव्हती. प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील मजकूर पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. विद्यापीठाने दिलेले मानवस्त्र परिधान करून आणि प्रमाणपत्र उंचावून अनेकांनी हा क्षण अक्षरश: साजरा केला. पदवी प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवाराची सैर केली.
पदवी प्रमाणपत्रे स्वीकारण्यासाठी अनेकजण कुटुंबीयांसह आले होते. उच्च पदवीधर झालेल्या विवाहित विद्यार्थिनींसोबत त्यांचे पती, मुले यांचीही उपस्थिती होती. बहुतांशी विद्यार्थिनी आई आणि मुलगीसोबत आल्या होत्या. मुरगूडच्या सीमा पाटीलसोबत आलेले धोतर फेट्यातील आजोबा आणि नऊवारी साडीतील आजी, नात पदवी घेतानाचा आनंद पाहून भारावलेले परीक्षा भवन, मुख्य इमारतीसमोरील बगीचा, ग्रंथालय येथे गर्दी होती. मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर स्नातक पदवी प्रमाणपत्रासह छायाचित्र काढून घेत होते.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे व त्यांची कन्या ऋतुजा घाटगे या दोघांनी एलएलबी (स्पेशल) ही डिग्री एकाच वेळी प्राप्त केली. अनिल घाटगे यांनी यापूर्वी चार डिग्री संपादित केल्या असून नुकतीच त्यांना एलएलबी स्पेशल ही पाचवी डिग्री मिळाली. ऋतुजा ही एलएलबी स्पेशल परीक्षेमध्ये विद्यापीठात दुसरी आली आहे. प्रत्येक वर्षी तिला शिवाजी विद्यापीठाची मेरिट स्कॉलरशिप मिळाली आहे. अनिल घाटगे हे शैक्षणिक क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. ते शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्यदेखील आहेत.
वसंत सिंघन यांनी वयाच्या 76 व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली. संशोधनाच्या आवडीतून त्यांनी प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभात सिंघन यांनी पीएचडी पदवी प्रमाणपत्र घेत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले.
विद्यार्थी ड्रेसकोड, ट्विनिंग करून कॅम्पसमध्ये आले होते. काही मुलींनी मोती रंग, पांढर्या, पेस्टल रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान केले होते. मुलांनी कुर्ता, कुणी पांढरे शर्ट - काळी पँट असा पेहराव केला होता. एमबीएच्या विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म परिधान करून पदवी स्वीकारली. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी काळा कोट परिधान करून पदवीचा आनंद साजरा केला. एकसारख्या ड्रेसकोडमधील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. काही युवती ग्रुपने जीपमधून आल्या होत्या
मी ऑर्गेनिक केमिस्ट्री विषयातून एमएस्सी पदवी घेतली. इचलकरंजीच्या डीकेएएससी महाविद्यालयातून मी शिक्षण पूर्ण केले. यंदा द्विभाषिक पदवी प्रमाणपत्र असल्याचा वेगळा आनंद आहे. विद्यापीठाच्या आवारात येऊन प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्र घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे. हा अनुभव देणारा क्षण आहे.प्रतीक्षा शिंदे, विद्यार्थिनी