कोल्हापूर : ‘केएसए’ शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी छत्रपती शाहू स्टेडियमवर अशी गर्दी केली होती.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

'KSA' Shahu Chhatrapati Football League | शिवाजी-पीटीएम ‘हाय व्होल्टेज’ झुंज 1-1 बरोबरीत

दोन्ही संघांचे गोल पेनल्टी स्ट्रोकवर : विजेतेपदासाठी चुरस वाढली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाचे आक्रमण आणि त्याला मुहतोड जबाब देत पाटाकडील मंडळाचा भक्कम बचाव त्याचवेळी तोडीस तोड पाटाकडील मंडळाच्या शिवाजी मंडळाने परतवून लावलेल्या खोलवर चढाया... असा हाय व्होल्टेज सामना अखेर 1-1 गोल बरोबरीत सुटला आणि दोन्ही संघांसह त्यांच्या हजारो समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हे वातावरण छत्रपती शाहू स्टेडियमवर उपस्थित हजारो फुटबॉलपे्रमींनी अनुभवले.

‘केएसए’ शाहू छत्रपती फुटबॉल लीगमध्ये गुरुवारी शिवाजी आणि पाटाकडील झुंज बरोबरीत सुटली, तर त्याआधीच्या सामन्यात स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या फुलेवाडी क्रीडा मंडळाला संध्यामठ तरुण मंडळाने तब्बल चार गोलने धुलाई करत शानदार विजयाची नोंद केली. दरम्यान, शिवाजी मंडळ आणि पाटाकडील मंडळ यांच्या बरोबरीनंतर स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

शिवाजी, पाटाकडीलचे गोल पेनल्टी स्ट्रोकवर

शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील ‘अ’ यांच्यातील सामन्यातील दोन्हीकडचे गोल पेनल्टी स्ट्रोकवर झाले. पाटाकडीलने पूर्वार्धात मिळविलेली आघाडी शिवाजीने उत्तरार्थातील जादा वेळेत कमी करत सामना 1-1 असा बरोबरीत केला. सामन्याच्या 16 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत शिवाजी मंडळच्या गोलक्षेत्रात बचावपटू सौरभ ढालेचा हॅण्डबॉल झाला. यामुळे मुख्यपंच अजिंक्य गुजर यांनी पेनल्टीचा निर्णय दिला यावर अरबाज पेंढारीने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर, ऋषीकेश मेथे-पाटील, रोहित मंडलिक, यशराज कांबळे, रोहित पोवार, यश देवणे यांनी आघाडीत भर घालण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. शिवाजी मंडळकडून गोल फेडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. योजनाबद्ध चाली रचत संपूर्णवेळ बॉल पाटाकडीलच्या क्षेत्रात ठेवण्यावर त्यांचा भर होता. करण चव्हाण-बंदरे, दर्शन पाटील, हर्ष जरग, संकेत जरग, संकेत नितीन साळोखे, विशाल पाटील, सौरभ ढाले, संकेत अनिल साळोखे यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी अपयशी ठरल्या. सामन्याच्या जादा वेळेत (80+) झालेली चढाई रोखण्याच्या प्रयत्नात पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात त्यांच्या अक्षय पायमलचा हॅण्डबॉल झाला. यामुळे मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर संकेत अनिल साळोखे याने बिनचूक गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत केला.

संध्यामठचा फुलेवाडीवर 4-0 ने विजय

दुपारी झालेल्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. सामन्याच्या दुसर्‍या मिनिटाला अभिजित साळोखेने, तर 29 व्या मिनिटाला कपील शिंदेने गोल केला. सामन्याच्या 46 व्या मिनिटाला अभिजित साळोखे याने वैयक्तिक दुसरा व संघाकडून तिसरा गोल केला. 70 व्या मिनिटाला कपील शिंदे याने वैयक्तिक दुसरा व संघाकरिता चौथा गोल केला. त्यांच्या अर्जुन साळोखे व श्रवण शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला. फुलेवाडीकडून कार्तिक लव्हटे, मंगेश दिवसे, दिग्विजय सुतार व शुभम देसाई यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे सामना संध्यामठने 4-0 असा एकतर्फी जिंकला. फुलेवाडी संघाचे महत्त्वाचे खेळाडू गेल्या सामन्यात झालेल्या कारवाईमुळे संघाबाहेर आहेत. त्याचा गुरुवारच्या या सामन्यात संध्यामठ संघाला फायदा झाल्याची चर्चा फुटबॉलप्रेमींत सुरू होती.

पोलिसांच्या उपस्थितीत हुल्लडबाजी बिनधास्त

लीगमधील महत्त्वाचा सामना असल्याने मैदानात फुटबॉलप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. यामुळे मैदान सुमारे 75 टक्के भरले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मैदानात पोलिस उपस्थित होते. तसेच, सीसीटीव्ही ही सुरू होते. मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंचा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार दोन-तीन वेळा झाला. तर प्रेक्षक गॅलरीत पोलिसांच्या समोरच हुल्लडबाजी बिनधास्तपणे सुरू होती. अर्वाच्च शिवीगाळ, अश्लील हवभावाबरोबरच हुल्लडबाजांनी सामना पाहायला आलेल्या महिला-मुलींनाही शिवीगाळ केली. महिला प्रेक्षक गॅलरीत महिला पोलिस असतानाही बिनधास्त हुल्लडबाजी सुरू होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी मैदानातील हुल्लडबाजांवर सीसीटीव्हीच्या सहाय्याने कारवाई करणार असल्याचे फुटबॉल हंगामापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, त्याची अद्याप कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT