कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत; पण स्थानिक राजकारण त्यांच्या लक्षात येत नाही. जिल्ह्यात ज्यांना भाजप संपवायची आहे, अशा मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन ते गोकुळमध्ये चालले आहेत; पण भाजप म्हणून ते आम्हाला जवळ करत नसल्याचा आरोप चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केला. तसेच यासंदर्भातील खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करणार असल्याचे आ. पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळमध्ये महायुती म्हणून जायचे असे सांगितल्याने यांच्यासोबत गेलो; पण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीला मंत्री मुश्रीफ यांना बोलवलं. जनसुराज्यचे समित कदम सांगलीचे त्यांचा गोकुळ, कोल्हापूरशी काहीही संबंध नाही, तरीही त्यांना बोलवलं; पण मला कल्पनाही दिली नाही. महायुती म्हणून एकत्र जाताना विचारात घेतले जाणार नसले, तर सतेज पाटील आम्हाला लांबचे नाहीत; पण गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढे जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
झेंडे घेऊनच फिरायचं का? चंदगडल चेअरमनपद घेणारचं
चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ या दोन्ही मंत्र्यांनी चंदगडसाठी काही केले नाही. मंत्री तुम्ही, गोकुळ, जिल्हा बँकेत तुम्ही, आम्हालादेखील भावना आहेत. किती सहन करायचं? आम्ही नुसतं झेंडे घेऊनच फिरायचे का? गोकुळमध्ये चंदगड, गडहिंग्लज, आजर्याला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत. चंदगडला चेअरमनपद घेणारच, अशी ठाम भूमिका आ. पाटील यांनी मांडली.
भाजप कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार
जिल्ह्यात राष्ट्रवादी, शिवसेना स्ट्राँग आहे; पण भाजप कुठे आहे? कार्यकर्त्यांनी काय करायचं, हे कोणी समजून सांगत नाही. मंत्री पाटील यांनी भाजप समजून घेऊन कार्यकर्त्यांना बळ द्यावे. गोकुळ ही सुरुवात आहे. यानंतर जिल्हा बँकेचीही निवडणूक आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रशासकांवर राजकीय दबाव
प्रशासक संजयकुमार सुद्रीक यांना मंत्री चंद्रकांत पाटील सकाळ, दुपार, संध्याकाळ फोन करतात. सुद्रीक यांनी तुमचे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यापैकी कोणाचे ऐकू असं बोलले आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. मुख्यमंत्री कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे जे योग्य आहे तशीच कार्यवाही करण्याबाबत सुद्रीक यांना सांगितले आहे.
नेमकं काय सुरू आहे समजत नाही
४२७ दूध संस्था अपात्र केल्या. त्यानंतर लगेचच त्या पात्र केल्या. नेमकं काय सुरू आहे, हे समजत नाही; पण ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. अपात्र संस्था पात्र झाल्या, तर गोकुळ एका नेत्याच्याच घरात राहील. १३२० संस्था लादल्या नसत्या, तर आम्ही आहे तसं निवडणुकीला सामोरे गेलो असतो, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
ठरावासाठी दहशतीचा वापर
आमच्याकडे गोकुळ, जिल्हा बँक, साखर कारखाना आहे. भाजपकडे काय आहे? कशाला ठराव देता? सर्वकाही आमच्या हातात आहे, असा साम, दाम आणि गोकुळच्या दहशतीचा वापर ठराव गोळा करण्यासाठी सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.