कागल : महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसऱ्या छायाचित्रात कागल येथील दूधगंगा नदीवर बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाळण्यात येणार्‍या काळा दिनाला पाठिंबा देण्यासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता जाणार्‍या शिवसेना नेते विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  (छाया : बा. ल. वंदुरकर)
कोल्हापूर

Belagavi Black Day | शिवसेना पदाधिकार्‍यांना बेळगावला जाताना रोखले

काळा दिनानिमित्त दूधगंगा पुलावर बंदोबस्त; देवणेंसह कार्यकर्ते ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कागल : बेळगाव येथे एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्‍या काळ्या दिनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून बेळगावकडे निघालेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विजय देवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांना कागल येथील दूधगंगा नदीवरील पुलावर महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीत पोलिसांनी अडवले. यावेळी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विजय देवणे व प्रमुख पदाधिकारी दूधगंगा पुलावर दाखल झाल्यानंतर त्यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखल्याने कार्यकर्त्यांनी पुलावर काही काळ ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटकच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. कागल पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

यावेळी ‘बेळगाव आमच्या हक्काचे’, ‘निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे काळा दिन पाळला जातो. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते बेळगावकडे जातात. यंदाही पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखले. या आंदोलनात विराज पाटील, विनोद आडके, प्रकाश पाटील, राजू यादव, विनोद खोत, साताप्पा नरके, मारुती पुरीबुवा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. दरम्यान, काही वेळाने शिवसेना (उबाठा) पक्षाचे संभाजी भोकरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आंदोलन केले. त्यांनीही कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्यांना रोखून परत पाठवले. या आंदोलनात अशोक पाटील, दिलीप पाटील, म्हाळूकरी कट्टी, बाळू माने, चंद्रकांत पाटील, गणेश रामपुरे, राहुल घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूधगंगा पूल परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

शिनोळी फाटा येथे ठाकरे सेनेची निदर्शने

चंदगड : कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाविरोधात एक नोव्हेंबर या काळ्यादिनानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शिनोळी फाटा येथे रविवारी (दि. १) सकाळी निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

सकाळच्या सत्रात सीमाभागातील तसेच चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने शिनोळी फाटा येथे एकत्र आले. यावेळी हातात भगवे ध्वज घेऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, शांता जाधव, चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजू रेडेकर, चंदगड तालुका प्रमुख विष्णू गावडे यांनी कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचला.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्याविरोधात घोषणा देऊन निदर्शने केली. युवराज पोवार, अजित खोत, जयसिंग टिकले, महेश पाटील, सुहास गुरव, यल्लाप्पा मुतकेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT