कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख यांनी होर्डिंग्जच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लागलेले हे होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले आहेत. होर्डिंग्जला पूर्ण भगवी बॅकग्राऊंड आहे. परिणामी, शिवसेनचे लक्ष आता काँग्रेसचे खा. शाहू महाराज घराण्यावर असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.
खा. शाहू महाराज यांचे सुपुत्र मालोजीराजे यांचा गुरुवारी (दि. 3) वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशमुख यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दसरा चौकासह इतर ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावले आहेत. काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्यासोबत बिनसल्यानंतर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेव्हापासून सतेज पाटील व मालोजीराजे यांच्यातही फारसे सख्य नाही. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी मालोजीराजे यांचे लावलेले होर्डिंग्ज चर्चेत आहेत. भगव्या रंगातील होर्डिंग्जमुळे मालोजीराजे भविष्यात शिंदे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.