कोल्हापूर : गोविंद पानसरे यांचे काय हाल झाले माहीत आहे ना, त्यांना भेटायला वर जा, असे सांगत तू जिथे असतील तिथे घरात घुसून, जीभ कापू, चिरडून टाकू, अशा शब्दांत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक, भाकप व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते प्रशांत श्रीकांत आंबी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांना आमदार संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाड यांनी आंबी यांच्यासह त्यांच्या आई आणि पत्नीविषयी अर्वाच्य शिवीगाळ केली. आ. गायकवाड आणि आंबी यांच्यातील फोनवरील हा संवाद गुरुवारी व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी आंबी यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गायकवाड यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकाला आक्षेप घेत बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी बुधवारी (दि. 22) रात्री उशिरा या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. ‘शिवाजी कोण होता?’ असे पुस्तकाचे शीर्षक का दिले, शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख का केला, असा सवाल केला. त्यावर आंबी यांनी हे पुस्तक 1988 साली पानसरे यांनी लिहिले आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही, आपण हे पुस्तक प्रथम संपूर्ण वाचा, त्यानंतर काही आक्षेप असेल तर आपण बोलू, पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, असे सांगितले.
त्यावर संतप्त झालेल्या आ. गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आंबी यांच्या आई आणि पत्नीलाही त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देत, त्यांचे काय हाल झाले माहीत आहे ना? त्यांना भेटायला तूही वर जा, अशी धमकीही गायकवाड यांनी दिली. आंबी आणि गायकवाड यांच्यात झालेला संवाद व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
आ. गायकवाड यांच्याकडून छत्रपती शिवरायांचा अवमान
आ. गायकवाड यांनी आपल्याशी आवेशात बोलताना स्वत:च छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आंबी यांनी केला. ‘शिवाजी महाराज तुझ्या आईचा ... होता का?’ असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात असंस्कृतपणा, स्त्रीदेहाचा अवमान करणारे घाणेरडे उच्चार होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे शब्द असल्याचा आरोपही आंबी यांनी केला आहे.
पोलिस अधीक्षकांची भेट घेणार
सर्व पुरावे समोर आहेत, तरीही पोलिस गुन्हा दाखल करणार नसतील तर पोलिस अधीक्षकांची भेट घेतली जाणार असल्याचे भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल होईपर्यंत लढा देऊ, असेही ते म्हणाले.