कोल्हापूर : रिमझीम पाऊस, साऊंड सिस्टीमचा दणदणाट, सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता अशा उत्साही वातावरणात गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे रचत हजारोंच्या संख्येने उपस्थित अबालवृद्धांची मने जिंकली. निमित्त होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आयोजित निष्ठेच्या दहीहंडीचे.
मिरजकरतिकटी येथे शनिवारी झालेली निष्ठेची दहीहंडी तासगाव (सांगली) येथील शिवाजी युवक मंडळाच्या गोविंदा पथकाने जिंकली. पथकातील चिमुरडी गोविंदा लक्ष्मी पाटील हिने सुमारे 35 फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडून उपस्थितांच्या टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळविली. विजेत्या पथकास 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार शाहू महाराज, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, प्रतीक सरनाईक, सुनील मोदी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, मधुकर रामाणे, संभाजी भोकरे, रियाज सुभेदार, बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, तेजस्विनी इंगवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल हिंदू समाजातर्फे रविकिरण इंगवले यांच्या संस्कृती जपण्याच्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
सलामीच्या फेरीत शिवाजी युवक मंडळ तासगाव (सांगली), गोडी विहीर गोविंदा पथक शिरोळ आणि श्री दत्त आमरेश्वर गोविंदा पथक अमरापूर शिरोळ यांनी सहभाग घेतला. यापैकी यशस्वी थर करणार्या शिवाजी मंडळ व गोडी विहीर मंडळाची निवड अंतिम फेरीत करण्यात आली. दोन्ही संघांना पहिल्या प्रयत्नांत अपयश आले; मात्र दुसर्या प्रयत्नात शिवाजी युवक मंडळ तासगाव पथकाने सात थरांसह दहीहंडी फोडत विजेतेपद पटकाविले.
दहीहंडीच्या ठिकाणी लक्षवेधी फलक लावण्यात आले होते. नांदणी मठातील हत्ती परत येईपर्यंत कोल्हापूरकरांचा लढा सुरूच राहणार, असा फलक लावण्यात आला होता.