कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. कारण त्यांच्या विचारांवर मी राजकारण करत नाही. मुश्रीफ काय हिटलर लागून गेले नाहीत? मुश्रीफ यांच्याबद्दल विचारू नका, मरू देत तिकडे, अशी टीका शिवसेना नेते माजी खा. संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी केली.
मंडलिक म्हणाले, कागलमध्ये शिवसेनेचे उमेदवारच उभारणार नाहीत, असे वातावरण केले. परंतु, आम्ही उमेदवार उभा करून टक्कर देत 33 टक्के मते मिळविली. कागलमध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती मतदारांना पसंत पडली नाही. मुरगूडमध्ये विजय अपेक्षित होता. परंतु, विरोधी बाजूंकडून पैशांचा वापर करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंडलिक यांनाही सोबत घेऊ, असे वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता मंडलिक म्हणाले, ते सोयीचे राजकारण करत आहेत. कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही, हे ते स्वतः ठरवतील. त्यांच्याशी माझी व्यक्तिगत नाराजी नाही. हे बांधाचे भांडन नसून महायुतीचा विषय आहे, मनात आले तर एखाद्याला घ्यायचे आणि नाही तर नाही घ्यायचे. केडीसी बँकेतही त्यांनी असाच प्रकार केला होता.
मुश्रीफांना माझी भीती वाटत असेल...
वास्तविक मुश्रीफ यांच्याकडून आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे. नगरपालिका निवडणूक हे त्याला निमित्त आहे. यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव केला. त्याचे विश्लेषण करताना माझ्या लक्षात आले की, कुर्हाडीचा दांडा गोतास काळ... ही भीती मुश्रीफ यांना आहे. कदाचित मंडलिक पुढच्या राजकारणात आपल्याला अडचणीचे ठरू शकतात, असे वाटत असल्याने मुश्रीफ हे निर्णय घेत असतील, असेही मंडलिक यांनी सांगितले.