कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना शिवसेनेचा ठाम पाठिंबा असून, त्यांच्या विजयासाठी शिवसैनिक प्रयत्न करतील, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. कोल्हापूरची नात आणि सून असलेल्या स्मिता जाधव उच्चशिक्षित असून, समाजकार्यातही सक्रिय आहेत. त्यामुळे त्या निश्चित विजयी होतील, असा विश्वासही आबिटकर यांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आबिटकर यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्ष संघटनेने एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांच्या विजयासाठी शिवसेनेने दिशा स्पष्ट केली असून, दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी पक्षाची संघटनात्मक ताकद उभी करण्याचा निर्धार या भूमिकेतून व्यक्त होत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानप यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. सानप हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व असल्याचे आबिटकर यांनी नमूद केले.
‘शिक्षक आमदार हा शिक्षकच हवा’ ही टॅगलाईन घेऊन सचिन सानप निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका या प्रचारातून मांडली जात आहे. डॉ. स्मिता जाधव, सचिन सानप यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री, जिल्हाप्रमुख आणि सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आबिटकर यांनी केले.