कोल्हापूर : नवीन राजवाड्यावर खुल्या आस्मानात डौलाने फडकणार्या भगव्या ध्वजाच्या साक्षीने 351 वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा दिमाखात साजरा झाला. सनई-चौघड्याचे मंगल सूर, डफ-तुणतुण्याच्या साथीत घुमणारा शिवशाहिरांचा आवाज आणि सैन्यदलाच्या शिस्तबद्ध बँड पथकाच्या साथीत शुक्रवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘दो तरफ निगा फर्माके, बरमीना - बरमेशूर - बरमे कदम... बराके, बरबुलंदी बरबोला... महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा....’ अशी सुवर्ण राजदंडधारी चोपदारांची प्रदीर्घ ललकारी, चौरे, मोर्चेल, अब्दागिरीसह विविध राज्यचिन्हे घेऊन उभारलेले हुजरे आणि मानकरी अशा राजदरबारी शिस्तबद्ध वातावरणात शिवराज्याभिषेकाचा एक-एक विधी पार पडला. पावसामुळे नवीन राजवाड्याच्या प्रांगणात नियोजित सोहळा यंदा पॅलेसमधील मुख्य राजदरबारात घेण्यात आला. यामुळे यंदाच्या सोहळ्याला ऐतिहासिक वैभवाची किनार लाभली होती.
सकाळी साडेनऊ वाजता शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर यशराजराजे यांच्या हस्ते अभिषेक झाला. कवड्याची माळ व पुष्पहार-फुले वाहून पूजन केले. यानंतर खा. शाहू महाराज, सौ. याज्ञसेनी महाराणी, माजी आ. मालोजीराजे, सौ. मधुरिमाराजे आदींनी शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिवादन केले. छत्रपतींचे राजोपाध्ये बाळकृष्ण दादर्णे यांच्या मंत्रोच्चारात सोहळ्याचे सर्व विधी झाले.
सोहळ्यास आ. सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत, विजय देवणे, हर्षल सुर्वे, उदय गायकवाड, आनंद माने व तेज घाटगे, जयेश ओसवाल, बबनराव रानगे, संदीप देसाई, उमेश सूर्यवंशी, रूपेश पाटील, सरदार घराण्यातील सदस्य कर्नल विजयसिंह गायकवाड, ऋतुराज इंगळे, नीलराजे पंडित-बावडेकर, बाळ पाटणकर, रणजीतसिंह व संग्रामसिंह चव्हाण (हिम्मत बहाद्दर), शिवराज गायकवाड, देवेंद्र व प्रद्युम्न खर्डेकर, प्राणिल इंगळे, धैर्यशील यादव, विश्वजित घाटगे आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या पाईप बँड पथकाने स्फूर्तीदायी गीतांचे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी व पथकाने शिवराज्याभिषेक गीतासह स्फूर्तीदायी पोवाड्याचे सादरीकरण केले.