Shiv Chhatrapati Award announced to eight players of Kolhapur
कोल्हापूरच्या आठ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूरच्या आठ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

कुस्ती, नेमबाजी, रग्बी, सायकलिंग, साहसी खेळासह दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग

arun patil

कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने 2022-23 या वर्षीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली. यात कोल्हापूरच्या आठ खेळाडूंचा समावेश आहे. नंदिनी साळोखे (कुस्ती), शाहू माने (नेमबाजी), श्रीधर निगडे व वैष्णवी पाटील (रग्बी), प्रतीक पाटील (सायकलिंग), कस्तुरी सावेकर (गिर्यारोहण), अन्नपूर्णा कांबळे व अफ्रिद अत्तार (दिव्यांग जलतरणपटू) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगूड येथे सराव करणार्‍या नंदिनी साळोखे हिने फिनलंड, इटली आदी स्पर्धांसह महान भारत केसरी किताब स्पर्धेत खुला गटात विजेतेपद पटकावले आहे. 10 मीटर एअर रायफल व 50 मीटर थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्पर्धांत 37 सुवर्ण, 11 रौप्य व 4 कांस्य पदकांची कमाई करणारा शाहू तुषार माने सध्या सेंट्रल रेल्वेमध्ये सक्रिय आहे.

नागदेववाडी (ता. करवीर) शेतकरी कुटुंब कुटुंबातील आणि सध्या पोस्ट विभागात सक्रिय असलेल्या श्रीधर श्रीकांत निगडे याने शेतीसह घरच्या जबाबदार्‍या सांभाळत हाँगकाँग, चायना, कतार, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय, 9 राष्ट्रीय स्पर्धांत पदकांची लयलूट केली आहे. वडील रिक्षाचालक असलेल्या पाडळी खुर्द येथील वैष्णवी दत्तात्रय पाटील हिने उझबेकिस्तान, जपान, इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय, चीन येथील एशियन गेम्स, फ्रान्समधील वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीप अशा स्पर्धा गाजविल्या आहेत.

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील प्रतीक संजय पाटील याने केरळ, अलिगढ, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गोवा येथील राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांत यशस्वी कामगिरी केली आहे. तो सध्या सेंट्रल रेल्वेमध्ये टी.सी. पदावर कार्यरत आहे. कस्तुरी दीपक सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट (2022), माऊंट अन्नपूर्णा (2022), माऊंट मनस्लू (2021), माऊंट मेरा (2019), कळसुबाई शिखर (2018) यासह महाराष्ट्रातील सह्याद्री आणि हिमालयातील विविध मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. दिव्यांग जलतरणपटू अन्नपूर्णा सुनील कांबळे हिने इटली येथील आंतराष्ट्रीय स्पर्धेसह मध्यप्रदेश, उदयपूर, बंगळूर, आसाम, मालवण, खेलो इंडिया अशा विविध राष्ट्रीय स्पर्धांत पदकांची कमाई केली आहे. अफ्रिद मुख्तार अत्तार याने दिव्यांग जलतरणात एशियन युथ पॅरा गेम्स (दुबई 2017) कांस्य, जर्मनी आयडीएम (2017) , 2019 शारजा जागतिक स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.