कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्वराज्याचे रक्षण करणार्या रणरागिणी ताराराणी यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी कोल्हापुरात शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवाची सुरुवात केली.
देशाच्या पारतंत्र्यातील इंग्रज राजवटीत स्वातंत्र्याची प्रेरणा देणार्या शिवछत्रपती-ताराराणी यांच्या रथोत्सवाची सुरुवात इसवी सन 1914 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. ही त्यावेळीच मोठी व क्रांतिकारी घटना होती. ही परंपरा जपत प्रतिवर्षी हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या तिसर्या दिवशी हा रथोत्सव होतो. यंदा रथोत्सव गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता, नगरप्रदक्षिणेने साजरा होत आहे. याची जय्यत तयारी छत्रपती चॅरिटबल देवस्थान ट्रस्ट, मावळा कोल्हापूर यासह पेठांमधील तालीम मंडळे, संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. जुना राजवाडा येथील श्री तुळजाभवानी देवीच्या आरतीने लवाजम्यासह रथाच्या नगरप्रदिक्षणेस सुरुवात होईल.
बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी रोड, नगारखाना कमानीतून परत भवानी मंडप असा रथोत्सवाचा मार्ग असेल. रथाचे स्वागत ठिकठिकाणी सप्तरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या व पुष्पवृष्टी, आतषबाजीने होणार आहे.