कोल्हापूर

कोल्हापूर : अजिंक्यतारा ‘गुजरीचा गोविंदा’

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तेसवा : महाद्वार रोड, गुजरीतील गुजरीचा गोविंदा दहीहंडी शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकाने सहा थर रचून फोडली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत असताना पथकातील बालगोविंदा शुभम पाटील याने रात्री सव्वादहाच्या सुमारास हंडी फोडताच उपस्थितांनी जल्लोष केला. न्यू गुजरी मित्र मंडळाच्यावतीने माजी नगरसेवक किरण नकाते व माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या हस्ते अजिंक्यतारा पथकाला एक लाखाचे बक्षीस देण्यात आले.

झिरो डिग्री ग्रुपने मने जिंकली…

दहीहंडी उत्सवात इंडियाज गॉट टॅलेंट स्पर्धेतील झिरो डिग्री ग्रुपचा डान्स सर्वांचे आकर्षण ठरला. लहान मुलांच्या डान्सने उपस्थितांना अक्षरशः नाचवून मने जिंकली. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करून ग्रुपने वाहवा मिळविली. त्याबरोबरच अभिनेत्री जान्हवी व्यास व 'ढोलकीच्या तालावर'फेम लक्ष्मी खैरे यांनीही उपस्थितांची मने जिंकली. तरुणाई बेधुंद होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटत होती. नेत्रदीपक विद्युत रोषणाई, लेसर शो यासह म्युझीक सिस्टीममुळे अवघा महाद्वार आनंदोत्सवात बुडाला.

दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शनासाठी कोल्हापुरातून 10 हजार तरुणांना घेऊन जाणार असल्याचे सांगितले. यावेळी कृष्णराज महाडिक, सुहास लटोरे, अमर नकाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, संजय कदम आदींसह इतर उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT